पाच जण गंभीर जखमी : बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी रात्री बापट गल्लीमध्ये एका मोकाट कुत्र्याने 11 जणांचा चावा घेतला. त्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बीम्स हॉस्पिटलमधील इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.
विजय देसाई, सुहास चव्हाण, अब्दुल रहमान, अमोघ सनदी आणि श्रीकांत कांबळे अशी गंभीर जखमी झालेल्या पाच जणांची नावे आहेत. सदर कुत्रा सातत्याने बापट गल्ली परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांना भुंकत अंगावर धावून जात होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आणि मनपाला सुद्धा कळविले आहे. तथापि आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्या उपद्रवी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये महानगरपालिका पूर्णत: अपयशी ठरली आहे. मनपाच्या दुर्लक्षामुळेच नागरिकांना निष्कारण त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही जणांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पाळलेली कुत्री रात्री बाहेर सोडत असल्याने त्यांचाही त्रास नागरिकांना होत आहे. बापट गल्ली येथील कुत्र्याचा प्रताप पाहता आता तरी प्रशासन जागे होणार का? हा प्रश्न निर्माण होत आहे.









