परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, तृणमूलच्या डेरेक ओ ब्रायन यांचा समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्यासह 11 जण राज्यसभेवर बिनविरोध निवडून येणार ही बाब आता स्पष्ट झाली आहे. केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील बळ या निवडणुकीनंतर 1 ने वाढून 94 होणार आहे. 24 जुलैला ही निवडणूक आता औपचारिकरित्या होणार आहे.
सोमवार हा या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. पण विजय निश्चित असलेले उमेदवार सोडून कोणीही अर्ज सादर केला नव्हता. परिणामी ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतून सहा, गुजरात विधानसभेतून 3 आणि गोवा विधानसभेतून 1 सदस्यासाठी निवडणूक होणार होती. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूकही होत आहे. या निवडणुकांचा निर्णय आता ठरल्यासारखाच आहे.
भाजपला मिळणार पाच जागा
11 जागांपैकी भाजपला 5 जागा मिळणार आहेत. त्यांच्यापैकी 3 जागा गुजरातमधून तर प्रत्येकी 1 जागा पश्चिम बंगाल आणि गोव्यातून मिळणार आहे. तर तृणमूल काँग्रेसला पोटनिवडणुकीतील एका जागेसह सहा जागा मिळणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, बाबुभाई देसाई आणि केसरीदेव झाला हे भाजपचे उमेदवार गुजरातमधून, अनंत महाराज पश्चिम बंगालमधून आणि सदानंद शेट तानवडे गोव्यातून निवडून येणार आहेत. तर डेरेक ओ ब्रायन, सुखेंदू शेखर रॉय, डोला सेन, साकेत गोखले, शमिरुल इस्लाम आणि प्रकाश बारीक हे सहा तृणमूल काँग्रेसचे नेते राज्यसभेत प्रवेश करणार आहेत.









