वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एकीकडे केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, तर दुसरीकडे नवे नाव धारण केलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीने आपापला गट भक्कम करण्याचा प्रयत्न चालविला असतानाच, देशात 11 महत्वाचे राजकीय पक्ष अद्यापही कुंपणावरच असल्याचे स्पष्ट होत आहे. या पक्षांकडे लोकसभेच्या एकंदर 91 जागा असल्याने त्यांचे राजकारणातील महत्व दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही. पुढील लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.
या पक्षांमध्ये आंध्र प्रदेशात सत्ताधारी असणारा वायएसआर काँग्रेस, ओडींशात सत्ताधारी असणारा बिजू जनता दल, तेलंगणात सत्ताधारी असणारा भारत राष्ट्र समिती हा पक्ष, बहुजन समाज पक्ष, तेलगु देशम पक्ष, शिरोमणी अकाली दल, एआयएमआयएम, एआययुडीएफ, निधर्मी जनता दल, शिरोमणी अकाली दल (मान गट) आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष असे हे पक्ष आहेत. त्यांच्यापैकी वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दल यांनी सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्ष किंवा रालोआ यांच्या दिशेने गेल्या 9 वर्षांमध्ये संसदेत कल दाखविला आहे. तर भारत राष्ट्र समिती या पक्षाने तटस्थ भूमिका घेतली आहे.
बहुजन समाज पक्ष हा सध्या दुर्बल झाला असला तरी, 2007 मध्ये या पक्षाने मायावती यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमताची सत्ता आणली होती. शिवाय, राजस्थान, मध्यप्रदेश छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांमध्येही या पक्षाचे काही प्रमाणात सामर्थ्य होते. इतर पक्ष हे प्रादेशिक असून त्यांचा काही मोजक्या मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे. या 11 पक्षांकडे एकंदर खासदार सध्या 91 आहेत. परिणामी, त्यांचे बळ दुर्लक्षित करता येण्यासारखे नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडेही अनेकांचे लक्ष आहे.









