► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात बस उलटून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. बहावलपूरहून इस्लामाबादला जात असताना एम-14 मोटरवेवर बस उलटल्याची माहिती देण्यात आली. पंजाब प्रांतातील फतेह जंग परिसरात हा अपघात झाला असून मृत प्रवासी बहावलपूर, वेहरी, शर्कपूर आणि इस्लामाबादचे रहिवासी आहेत. अपघातानंतर तीन महिलांसह सहा जणांना बेनझीर भुट्टो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्य एका जखमीला इस्लामाबादमधील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समजते. पोलीस महानिरीक्षक रिफत मुख्तार यांनी या अपघाताची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.









