पदवीधर मतदारसंघातून पाच जणांची माघार
प्रतिनिधी /बेळगाव
वायव्य शिक्षक व पदवीधर संघाची निवडणूक होत असून या निवडणुकीमधून सोमवारी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. पदवीधर मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली असून आता 11 जण रिंगणात आहेत तर शिक्षक मतदारसंघासाठी 12 जण रिंगणात उतरले आहेत.
यामुळे या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रीय पक्षासह काही अपक्षांनीही आपली कंबर कसली आहे.
या मतदारसंघासाठी 19 मेपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. 26 मे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज छाननी 27 रोजी झाली. सोमवार दि. 30 रोजी अर्ज माघारीचा दिवस होता. यादिवशी पदवीधर मतदारसंघातून पाच जणांनी माघार घेतली असून आता 11 जण रिंगणात आहेत. 13 जून रोजी मतदान होणार आहे तर 15 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. आता प्रचाराला वेग येणार असून काही जणांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेससह काही अपक्षही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण होणार आहे.
4 अतिरिक्त मतदान केंदे
मतदान दि. 13 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत होणार आहे. या मतदानासाठी एकूण 78 मतदान केंदे स्थापन करण्यात येणार आहेत तर 4 अतिरिक्त मतदान केंदेही राहणार आहेत. 15 जून रोजी मतमोजणी होणार आहे. वायव्य शिक्षक पदवीधर संघासाठी एकूण तीन जिल्हय़ांमध्ये 24 हजार 303 मतदार आहेत. तर वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 84 हजार 252 मतदार आहेत. या पदवीधर संघामध्ये बेळगाव, बागलकोट आणि विजापूर या जिल्हय़ांचा समावेश आहे. बेळगावात या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. यासाठी बी. के. कॉलेजमध्ये मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याची तयारीदेखील पूर्ण झाली आहे.









