राज्यसरकारतर्फे आयोजन : विक्रेत्यांना मोफत स्टॉल्स

प्रतिनिधी /पणजी
गोवा सरकारतर्फे राज्यात एकूण 23 ठिकाणी आज शनिवार 20 ते 30 ऑगस्ट असे 11 दिवस स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार सुरू करण्यात येत असून राज्यातील बाराही तालुक्यात हा बाजार भरणार आहे. लोकांना त्यामुळे गणेशचतुर्थी साजरी करण्यासाठी आपापल्या तालुक्यात हा बाजार खरेदीकरीता उपयोगी पडणार आहे. ‘आत्मनिर्भ भारत, स्वयंपूर्ण गोवा’ या मोहिमेअंतर्गत हा बाजार आज सुरू होत आहे.
सालसेत तालुक्यात मडगाव कदंब बसस्थानक आणि कुंकळ्ळी बस स्थानकात हा बाजार भरणार असून काणकोणमध्ये कदंब बसस्थानक व श्रद्धानंद जुनी शाळा इमारत – पैंगीण येथे बाजार होणार आहे. केपे तालुक्यात कुडचडे मार्केटजवळील मैदानात तर मुरगांवात वास्को बसस्थानकात हा बाजार आहे.
डिचोली तालुक्यात सांखळी बसस्थानक व डिचोलीतील कॉर्पोरेशन हॉलकडे हा बाजार होईल. पेडणे बसस्थानक येथे चतुर्थी बाजार होणार आहे.
बार्देशमध्ये 4 ठिकाणी बाजार भरणार आहे. नवीन बसस्थानक म्हापसा, सरकारी संकुल-म्हापसा, आसगांव गणेश मंदिराकडे व अस्नोडा बसस्थानकात या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तिसवाडीत मलवारा-आगशी, ताळगांव – पंचायत सभागृह येथे तर सत्तरीत होंडा-वाळपई बसस्थानकात बाजार होणार आहे. धारबांदोडा क्रीडा मैदानावर तर सांगेमध्ये नगरपालिका संकुलात हा बाजार होईल. सकाळी 9 ते रात्रौ 8 अशी बाजाराची वेळ निश्चित करण्यात आली आहे. हा बाजार विक्रेत्यांसाठी मोफत आहे.









