राष्ट्रपतींच्या हस्ते होणार प्रदान ः पंतप्रधान मोदी साधणार संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी 11 बालकांना त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) 2023 प्रदान करणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरस्कार विजेत्यांशी मंगळवारी संवाद साधणार आहेत. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, सामाजिक सेवा, शिक्षण आणि क्रीडाक्षेत्रातील असाधारण कामगिरीसाठी मुलामुलींना हा पुरस्कार दिला जात असतो. मागील वर्षी 29 मुलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी देखील या पुरस्कारप्राप्त मुलामुलींशी संवाद साधणार आहेत. महिला आणि बालविकास राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई यांच्या उपस्थितीत या मुलामुलींचे अभिनंदन केले जाणार आहे. पुरस्कारप्राप्त मुलामुलींमध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 6 मुले आणि 5 पुलींचा समावेश आहे.
यंदा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 11 मुलामुलींना विविध क्षेत्रांमधील असामान्य कार्यासाठी दिला जाणार आहे. कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी 4 बालकांना गौरविण्यात येणार आहे. तर शौर्य दाखविल्याप्रकरणी एका बालकाला हा पुरस्कार मिळणार आहे. नवोन्मेषी कामगिरीसाठी 2 बालकांचो गौरव होणार आहे. सामाजिक सेवेसाठी एका बालकाचा तर क्रीडाक्षेत्रातील यशासाठी 3 मुलांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
पीएमआरबीपीच्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला एक पदक, 1 लाख रुपयांचा रोख पुरस्कार आणि एक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. केंद्र सरकार मुलांना त्यांच्या असाधारण कामगिरीसाठी पीएमआरबीपी पुरस्कार प्रदान करते. हा पुरस्कार 5-18 वयोगटातील मुलांना कला तसेच संस्कृती, शौर्य, नवोन्मेष, शिक्षण, सामाजिक सेवा आणि क्रीडाक्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो.









