प्रतिनिधी/ सातारा :
सातारा जिल्हय़ात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने वातावरणात चिंताजनक बनू लागले होते. तर बाधितांच्या सहवासात आलेल्या असंख्यजणांची काळजी वाढत होती. मात्र बाधितांच्या सहवासात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येणे ही जमेची बाजू असून आता जिल्हय़ात कोरोनामुक्त होत असलेले रुग्ण गंभीर परिस्थितीत वातावरण दिलासादायक करत आहेत. लॉकडाऊनचा अर्थ सातारकरांना चांगला कळला असून सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे सवलतीचा थोडा काळ सोडता 11 नंतर सातारा चिडीचूप होत आहे.
सातारा जिल्हय़ात आरंभीच्या काळात कोणीही कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने दिलासा मिळत होता. मात्र त्यामुळे जिल्हय़ात लॉकडाऊनची गंभीरता पाळली जात नव्हती. पोलीस दलाला संचारबंदीत कठोर होवून काही निर्णय घ्यावे लागले ते जनतेच्या हितासाठीच होते. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रथमपासून जिल्हय़ातील नागरिकांसह मुंबई, पुणेकरांना घरातच बसण्याचे आवाहन केले होते. होमक्वारंटाईन केलेल्यांनी कालावधी पूर्ण झाल्याशिवाय घराबाहेरच पडू नये असे आवाहन ते वांरवार करत होते त्यांची कळकळ आता नागरिकांना कळू लागल्याने जिल्हाभरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या सकाळी व सायंकाळी काही वेळ सवलत देण्यात आली आहे. मात्र खरं तर नागरिकांनी गरज असेल तर बाहेर पडले पाहिजे अन्यथा बाहेर पडण्याची गरजच नाही असे समोर उभे ठाकलेले संकट सांगत आहे. एकाच दिवशी चार कोरोनाबाधित समोर आल्यानंतर जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 वर गेल्यानंतर नागरिक गंभीर झाले आहेत. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे, मास्क वापरणे, घरीच थांबणे या गोष्ठी नागरिक करत असल्याने लढाई यशस्वी करण्यासाठी त्याचे बळ निश्चितपणे मिळणार आहे.
सातारकरांमधून लॉकडाऊनचे नियम कडक पाळले जात असून मॉर्निंग, इव्हेनिंग वॉकवाऱयांवरील कारवाई सुरुच असल्याने आता वॉकिंगही बंद झाले आहे. रस्त्यावर वाहनांना बंदीच आहे. अत्यावश्यक कारण सोडल्यास नागरिकांनी वाहने बाहेर काढूच नयेत. सवलतीच्या काळात खरेदीसाठी येताना नागरिकांनी चालतच यावे व चालत घरी जावे. उगाचच फिरणारे, दुचाकीस्वार यांच्यावर मात्र कारवाई अटळच असल्याचा इशारा पोलीस दलाने दिला आहे.









