बेळगाव : दहावीच्या पुरवणी परीक्षेला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी प्रथम भाषा विषयाचा पेपर घेण्यात आला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी तर उर्वरित माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी व कन्नड विषयाचा पेपर दिला. सीसीटीव्ही तसेच वेबकास्टिंगच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यात आली होती. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 42 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. शहराच्या उत्तर भागातील 7 तर दक्षिण भागातील 2 परीक्षा केंद्रांवर परीक्षेला सुरुवात झाली. दहावी मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. 26 मे ते 2 जून दरम्यान परीक्षा घेण्यात येत आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी विषयांनुसार परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यानुसार प्रथम भाषा पेपरला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी होती. यानंतरच्या पेपरला गर्दी होण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जात होते.
1109 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 42 केंद्रावर सोमवारी प्रथम भाषा पेपर घेण्यात आला. 6722 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 5613 विद्यार्थी परीक्षेसाठी हजर होते. तर उर्वरित 1109 विद्यार्थ्यांनी पेपरला दांडी मारली. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.









