ग्रामीण भागातील दहावी परीक्षा केंद्रांसाठी अधिसूचना जारी : दहावीची परीक्षा केंद्रे आता सर्कल, तालुका, जिल्हा केंद्रस्थानीच
वार्ताहर/ बेंगळूर
मार्च 2024 मध्ये राज्यभरात दहावीची परीक्षा काटेकोरपणे घेण्याचा निर्णय कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. ग्रामीण भागातील दहावी परीक्षा केंद्रे इतरत्र हलविण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्कल (होबळी), तालुका आणि जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना अधिक प्राधान्य देऊन त्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मागील काही वर्षांतील सामूहिक कॉपीच्या प्रकरणांवर पालकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने यावेळी सर्वच स्तरावरील शिक्षणाधिकारी व शिक्षकांनी कॉपी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे शिक्षण खात्याने म्हटले आहे. गेल्या वर्षी दहावीची मुख्य परीक्षा राज्यभरात एकूण 3,305 केंद्रांवर घेण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी 724, तालुक्याच्या ठिकाणी 755, सर्कल पातळीवर 604 आणि ग्रामीण भागात 1,222 परीक्षा केंद्रांचा समावेश होता. मात्र, यावेळी केंद्रांची संख्या कमी करणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे परीक्षा केंद्रावर देखरेख करणे शक्य होणार आहे. शक्य तितके क्लस्टर केंद्रे कमी करावेत. अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी परीक्षा केंद्र उभारण्यासाठी नियम शिथिल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्लस्टर स्तरावर अधिक विद्यार्थी आसनक्षमता असणाऱ्या परीक्षा केंद्रांना 10 कि. मी. परिक्षेत्रातील 8 ते 10 शाळा जोडाव्यात. त्या ठिकाणी परीक्षा केंद्र बनवून सर्व व्यवस्था करावी. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था तळमजल्यावर न करता पहिल्या मजल्यावर करावी, असेही सांगण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रांसाठी उच्च माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालये निवडली जावीत. प्रत्येक खोलीत किमान 24 विद्यार्थी बसतील आणि प्रत्येक केंद्रात किमान 400 आणि जास्तीत जास्त 800 विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था असावी. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगळी केंद्रे निर्माण करू नयेत, असेही सूचित करण्यात आले आहे.
परीक्षा बोर्डाने हाती घेतलेले उपक्रम
परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक खोल्या संख्या, आसन व्यवस्था, संरक्षक भिंत, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी योग्य वाहतूक व्यवस्थेसह प्रश्नपत्रिका वेळेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी योग्य सुविधा आहे का, हे तपासण्यात येणार आहे.









