मातृभाषा पेपरने होणार परीक्षेला सुरुवात
प्रतिनिधी / बेळगाव
शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज प्रारंभ होत आहे. या परीक्षेची शिक्षण खात्याने पूर्ण तयारी केली असून गुरुवारी सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे क्रमांक घालण्यात आले. एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत असतानाच आता याच वातावरणात दहावीची परीक्षाही होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 120 केंद्रांवर एकूण 33 हजार 182 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांपर्यंत जाण्यासाठी परिवहन मंडळाने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट दाखविणे आवश्यक आहे.









