कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेला आज (दि. 21) पासून प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर शिक्षण मंडळांतर्गत 357 केंद्रावर 1 लाख 32 हजार 929 तर कोल्हापूर जिल्ह्यात 54 हजार 810 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी न घाबरता दहावीची परीक्षा द्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा संपल्या असून, लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चिती केली आहेत. उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख व इतर साहित्य परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले आहेत. जिल्हानिहाय पर्यरक्षक व केंद्र संचालकांच्या नियुक्ती केली आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकांसह बैठ्या पथकांची नियुक्ती केली आहे. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
- कोल्हापुरातील परीक्षा केंद्र व विद्यार्थी
परीक्षार्थी-54,810
परिरक्षण केंद्रे-17
परीक्षा केंद्रे-138
कर्मचारी वर्ग बदललेली परीक्षा केंद्र संख्या-34
परीक्षार्थी प्रविष्ट करण्राया शाळांची संख्या-977
- हॉल तिकिट विसरल्यास हे करा
एखाद्या पेपरला हॉल तिकिट विसरल्यास घाबरून न जाता पर्यवेक्षक किंवा केंद्रसंचालक यांच्या ही बाब निदर्शनास आणावी. केंद्रावर दुबार प्रवेशपत्र असल्याने पडताळणी करता येऊ शकते. पण जाणीवपूर्वक विसरु नये. केंद्र संचालकांकडे हमीपत्र लिहून द्यावे, दुसऱ्या दिवशीच्या पेपरवेळी प्रवेशपत्र न चुकता आणावे, ते केंद्रसंचालकांना दाखवावे.








