पुरवणी परीक्षेतही मुलीच अव्वल
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये दहावीचा निकाल 29.18 टक्के तर बारावीचा निकाल 30.15 टक्के लागला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात 6.66 टक्के घट झाली आहे. तर बारावीच्या निकालात 0.45 टक्केनी वाढ झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डी. एस. पोवार यांनी दिली.
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या निकालातही मुलीच अव्वल आहेत. दहावीच्या परीक्षेत 27.79 टक्के मुल तर 32.62 टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात कोल्हापूर प्रथम, सांगली व्दितीय आणि साताऱ्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीसह इतर व्यवसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून शासनाने घेतलेल्या पुरवणी परीक्षेचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. तर बारावीच्या परीक्षेत 24.2 टक्के मुल तर 46.78 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावी परीक्षेत कोल्हापूर प्रथम, सांगली व्दितीय आणि साताऱ्याने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थ्यांचा बी.ए., बी.कॉम., बी.एस्सीसह अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेसाठी अर्ज भरावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने केले आहे.
दहावीचा जिल्हानिहाय निकाल
जिल्हा परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णतेचा टक्का
कोल्हापूर 894 309 34.56 टक्के
सांगली 847 245 28.92 टक्के
सातारा 699 158 22.60 टक्के
एकूण 29.18 टक्के
बारावीचा जिल्हानिहाय निकाल
जिल्हा परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी उत्तीर्णतेचा टक्का
कोल्हापूर 1650 552 33.45 टक्के
सांगली 1374 428 31.14 टक्के
सातारा 1539 396 25.73 टक्के
एकूण 30.15 टक्के









