अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांची माहिती
पणजी : दहावी व बारावी या दोन इयत्तांची दुसरी आणि अंतिम सत्र परीक्षा अनुक्रमे 1 एप्रिल व 15 मार्चपासून सुरू होणार आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (गोवा बोर्ड) अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी ही माहिती दिली. बारावी परीक्षेचा निकाल 30 एप्रिलपर्यंत तर दहावी परीक्षेचा निकाल 25 मे पर्यंत लावण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. येत्या 16 फेब्रुवारीपासून बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार असून त्यात एकूण 7 विषय समाविष्ट आहेत. फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉली, कॉम्प्युटर सायन्स, जॉग्रॉफी, बँकिंग यांचा त्यात समावेश आहे. ती प्रात्यक्षिक परीक्षा मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. बारावीची परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणारी दहावी परीक्षा 20 ते 25 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून एकच परीक्षा
गेली दोन वर्षे दहावी बारावी या दोन्ही इयत्तांसाठी प्रथम, दुसरे सत्र अशा दोन परीक्षा घेण्यात आल्या. आता ती दोन परीक्षांची पद्धत पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे 2023-24 पासून बंद करण्यात येणार असून पुन्हा जुनी वर्षातून शेवटी एकच परीक्षा पद्धती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दोन परीक्षांमुळे दोनवेळा उत्तरपत्रिकांची तपासणी करावी लागते व दोन वेळा निकाल तयार करावा लागतो. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळही नसल्याने बोर्डाने दोन सत्र परीक्षा पद्धती बंद करण्याचे ठरवले असल्याचे सुत्रांनी सांगितले. शिक्षक, परीक्षक, विद्यार्थी यांच्यावरही दोन परीक्षांमुळे ताण येतो, असे निदर्शनास आल्यामुळे हा बदल करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी नमुद केले.









