कोल्हापूर / कृष्णात चौगले :
पन्हाळा तहसील कार्यालयाकडून तत्कालिन तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या कार्यकाळात नियमबाह्यरित्या 109 अकृषिक परवाने दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांच्या तक्रारीनुसार तहसीलदार माधवी शिंदे–जाधव यांनी केलेल्या चौकशीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. या परवान्यांसाठी खोटे दाखले जोडल्याचे सिद्ध झाल्यामुळे ते रद्द करून त्याची नोंद संबंधित गटाच्या सातबारा पत्रकी घेतली आहे. या प्रकरणावर ‘तरुण भारत संवाद’ने वेळोवेळी आवाज उठवला होता.
नियमानुसार गावठाणच्या कलम 122 खालील घोषित केलेल्या हद्दीपासून 200 मीटर परिघीय क्षेत्रातील जमिनी अकृषिक (एनए) करता येतात. पण हा नियम डावलून परवाने दिले आहेत. याबाबत सुहास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवर पुणे विभागीय उपायुक्त रामचंद्र शिंदे यांनी अकृषिक परवान्यांसह तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांची कार्यालयीन चौकशी करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले होते. त्यानुसार पन्हाळा तहसीलदारांनी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला आहे. वास्तविक 1 जून 2022 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील अकृषिक परवान्यांबाबत पाटील यांनी तक्रार दिली होती. पण तत्कालिन तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या कार्यकाळात पारीत केलेल्या सर्व दाखल्यांची चौकशी करण्यात आली असून यामध्ये 109 परवाने नियमबाह्यरित्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्कालिन तहसिलदारांनी 1 जून 2022 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पन्हाळा तालुक्यात 46 अकृषिक परवाने दिले होते. यापैकी सुमारे 24 परवाने गावठाणापासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रात येत नसलेल्या गटांसाठी दिल्याची सुहास पाटील यांची तक्रार होती. गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आत सदरचे गट येत नसताना तसेच मंडळ अधिकाऱ्यांचा स्थळ पाहणी अहवाल नसताना 24 अकृषिक आकारणी बाबतचे ना–हरकत दाखले बेकायदेशीररित्या दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते. त्यामुळे याबाबत सुहास पाटील यांनी तत्कालीन पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांची कार्यालयीन चौकशी करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार तहसिलदार माधवी शिंदे–जाधव यांनी तत्कालिन तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या कार्यकाळातील सर्व अकृषिक परवान्यांची चौकशी करून अहवाल तयार केला आहे.
सामाजिक कार्यकर्ता पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीअंती पन्हाळा येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून पारीत केलेल्या गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या परिघिय क्षेत्रातील एकूण 130 दाखल्यांपैकी 64 दाखले आपल्या कार्यालयाकडून दिले नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे संबंधित अर्जदारांनी 64 दाखले खोटे जोडल्याचे सिद्ध झाले असून त्यांना नोटीस बजावून सुनावणी घेऊन दाखल रद्द करणार असल्याचे तहसिलदारांच्या अहवालात नमूद आहे. तसेच सहाय्यक संचालकनगर रचना कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या 52 दाखल्यांच्या प्रकरणांमध्ये 45 प्रकरणामध्ये खोटे दाखले जोडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदरचे अकृषिक परवाने रद्द केले आहेत.
- प्रस्तावासोबत जोडलल्या कागदपत्रानुसारच अकृषिक परवाने
अकृषिक परवान्यासाठी संबंधित अर्जदाराने जोडलेल्या कागदपत्रानुसार आणि नियमानुसार शासनाकडे योग्य रक्कम भरल्यानंतरच अकृषक परवाने दिले आहेत. तत्कालिन तहसिलदारांनी सर्व नियमांचे पालन करूनच हे दाखले दिले आहेत. पण काही अर्जदारांनी 200 मीटरच्या परिघीय क्षेत्राबाबतचे खोटे दाखले जोडून प्रशासन आणि शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे तत्कालिन तहसिलदारांना दोषी न धरता सदरचे अकृषक परवाने रद्द केले असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे.
- चौकशीबाबतचा सविस्तर अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविणार
पन्हाळा तहसिल कार्यालयातून तत्कालिन तहसिलदार रमेश शेंडगे यांच्या कार्यकाळात 109 नियमबाह्य अकृषिक परवाने दिले असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालात आणखी काही बाबी समाविष्ठ करून सविस्तर अहवाल लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे.
समीर शिंगटे, प्रांताधिकारी, पन्हाळा–शाहूवाडी
- चौकशीमध्ये तत्कालिन तहसीलदारांना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न
गावठाणापासून 200 मीटर परिघीय क्षेत्राच्या गटांची यादी न तपासताच अकृषिक परवाने दिल्याबद्दल महसूल सहाय्यकासह तत्कालिन तहसिलदार रमेश शेंडगे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली होती. पण सध्याच्या तहसीलदार माधवी शिंदे–जाधव यांनी चौकशीमध्ये क्लिन चिट देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ता








