लाँग टर्म व्हिसा मिळवून अनेक वर्षांपासून वास्तव्य
प्रतिनिधी/ बेळगाव
पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी धाडण्याचे काम हाती घेतले आहे. स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची सूचना दिली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसह कर्नाटकात ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलीस यंत्रणेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार एका बेळगाव शहर व जिल्ह्यात सहा पाकिस्तानी आहेत. ते सर्व जण लाँग टर्म व्हिसावर आलेले आहेत. यापैकी बहुतेक जण भारतीय नागरिकांशी लग्न केलेले आहे. त्यामुळे केंद्राच्या आदेशापासून त्यांना सुट मिळणार आहे. संपूर्ण राज्यात 108 हून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत. यापैकी 88 जणांनी भारतीय नागरिकांशी लग्न केले आहे.
लाँग टर्म व्हिसावर कर्नाटकात आलेले पाकिस्तानी नागरिक वेळोवेळी आपल्या व्हिसाचे नुतनीकरण करून घेत आहेत. वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात 13 पाकिस्तानी नागरिकांना कर्नाटकात अटक झाली आहे. त्यांच्याविरुद्धचे खटले राज्यातील विविध न्यायालयात सुरू आहेत. ज्यांनी भारतीय नागरिकांशी लग्न करून अनेक वर्षांपासून कर्नाटकात वास्तव्य केले आहे. त्यांना या आदेशापासून सूट मिळणार अशी माहिती मिळाली आहे.
पोलीस व गुप्तचर यंत्रणा पाकिस्तांनी नागरिकांच्या शोधात आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार त्यांना देशाबाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिक मात्र संकटात सापडले आहेत. सरकारी आदेशामुळे उपचार पूर्ण होण्याआधीच त्यांना देश सोडावा लागणार आहे. त्यामुळे अनेकांनी दोन्ही देशांकडे मुदतवाढ देण्यासाठी मागणी केली आहे.
बेंगळूर, भटकळ, बेळगाव, म्हैसूर, मंगळूरसह विविध जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिकांचा वास्तव्य आहे. बेंगळूर येथील परप्पन अग्रहार व बेळगावच्या कारागृहातही दहशतवादी कारवायात गुंतल्यांच्या आरोपातून अटक करण्यात आलेले 13 पाकिस्तानी नागरिक स्थानबद्धतेत आहेत. वैद्यकीय उपचारासाठी पाकिस्तांनमधून बेंगळूरला पाच जण आले आहेत. त्यांना देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.









