प्रतिनिधी /पणजी
यंदाच्या मौसमात गोव्यात एकूण 108.62 इंच पाऊस पडला. मोसमी पावसाने अधिकृतपणे काल 30 सप्टेंबर रोजी निरोप घेतला असला तरी मौसमोत्तर पावसालाही गोव्यात दमदार सुरुवात झालेली आहे. आज व उद्या गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता असून यंदा ऑक्टोबरमध्ये वार्षिक सरासरीएवढाच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
आजपासून पावसाचा नवा मौसम सुरू झाला आहे. मान्सूनोत्तर पाऊस गोव्यात सुरू झाला आहे. शुक्रवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते. अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पणजीत अत्यंत तुरळक अशी पावसाची नोंद झाली. यंदाच्या मौसमात राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची सरासरी नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मौसमात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पावसाचा जोर मंदावला आणि सरासरीच्या तुलनेत 10 टक्के घट आली. वार्षिक सरासरीनुसार 120 इंच पावसाची नोंद होणे आवश्यक होती यंदा मात्र मौसमात 108.62 इंच एवढी पावसाची नोंद झाली. उत्तर गोव्यात 114 इंच, तर दक्षिण गोव्यात 103.83 इंच एवढी पावसाची नोंद झाली.
वार्षिक सरासरीपेक्षा हा पाऊस 12 इंचानी कमी झालेला असला तरीही तो समाधानकारक झालेला आहे. गेल्या 5 वर्षांचे पावसाचे प्रमाण पहाता यंदा तो सर्वात कमी पाऊस ठरला.
यंदा 2018 नंतरचा सर्वात कमी पाऊस
गेल्या पाच वर्षांचा विचार करता 2018 मध्ये सर्वात कमी पाऊस झाला होता. त्यानंतर यंदाचा हा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. गेल्या पाच वर्षात गोव्यात नोंद झालेला पाऊस पुढील प्रमाणे.
- 2018 2414 मि. मी. 96.40 इंच
- 2019 3942 मि. मी. 157.42 इंच
- 2020 4203 मि. मी. 167.85 इंच
- 2021 3156 मि. मी. 126 इंच
- 2022 2720 मि. मी. 108.62 इंच