केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ने गौरव
आर. पापाम्मल 107 वर्षांच्या आहेत. तरीही या वयात सेंद्रीय शेतीसाठी त्यांचा उत्साह पाहणे सुखद असते. त्यांची संघर्षगाथा शेती आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱया कुठल्याही व्यक्तीला बळ देणारी आहे. पापाम्मल यांना स्थानिक लोक अम्मा या नावाने ओळखतात आणि हाक मारतात. पापाम्मल म्हणजेच अम्मा यांची पूर्ण कथा एका अर्थाने उदाहरण ठरते. कुठलाही व्यक्ती कुठल्याही वयात कशाप्रकारे काम करू शकतो हे त्यांचे जीवन दाखवून देणारे आहे.
आर. पापाम्मल म्हणजेच पूर्ण एक शतक स्वतःच्या डोळय़ांनी पाहणाऱया वृद्ध महिलेबद्दल सांगायचे झाल्यास 1914 मध्ये जन्मलेल्या त्या तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्हय़ाच्या एक छोटय़ा गावात थेक्कमपट्टीमध्ये राहतात. या गावातील या महिला शेतकरीला सेंद्रीय शेतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याप्रकरणी भारत सरकारने यंदा म्हणजेच 2021 मध्ये पद्मश्रीने गौरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच तामिळनाडूच्या दौऱयादरम्यान पापाम्मल यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबतचे मोदींचे छायाचित्र सोशल मीडियावर अत्यंत चर्चेत राहिले होते. त्यांनी मोदींच्या कपाळावर हात ठेवत आशीर्वाद दिला होता.
काळय़ा मातीत हिरवीगार किमया

आर. पापाम्मल दरदिनी स्वतःच्या अडीच एकर जमिनीत सेंद्रीय शेती करतात. त्यांच्या या वयात लोक स्वतःच्या जीवनाविषयी विचार करणेही बंद करतात. पण आर. पापाम्मल केळीच्या बागेत काम करताना दिसून येतात. त्यांचे लहान शेतच त्यांची कर्मभूमी आहे. काळय़ा मातीत उगणाऱया हिरव्यागार पिकांदररम्यान त्या दिवसभर स्वतःचा घाम गाळत असतात. शेतीवरील त्यांचे अनोखे पेमच त्यांच्या या कर्तबगारीचे कारण आहे. शेतीची प्रक्रिया त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि बोलीत अशाप्रकारे सामावून गेली आहे, की आजच्या पिढीसाठी त्या प्रेरणादायी आहेत.
मनाने अन् शरिराने तंदुरुस्त

6 फूट उंचीचे शरीर, मजबूत शरीरयष्टी, धनुष्याप्रमाणे कणा आणि कधी न थकणारे पाय तसेच डोक्यावरील पांढरे केस त्यांच्या सौंदर्याला नवा आयाम प्रदान करतात. त्यांची स्मरणशक्ती आजही चांगली आहे. मनाने तरुण आणि विचारांमध्ये स्पष्टपणा बाळगणाऱया त्या महिला आहेत. आर. पापाम्मल सातत्याने स्वतःच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना सक्रीय राहणे आणि सातत्याने काम करण्यासाठी प्रेरित करत असतात.
कठोर मेहनतीचा ध्यास
पापाम्मल यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात देवलपुरम नावाच्या गावात झाला होता. त्यांचे कुटुंबीय स्वतःच्या शेतात धान्य उगविण्यासाठी केवळ कठोर मेहनतीवर विश्वास ठेवायचे. याचमुळे शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने कठोर मेहनत करणे त्यांच्या रक्तातच आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी जन्मलेल्या पापाम्मल यांनी अजाणत्या वयातच स्वतःच्या आईवडिलांचे छत्र गमावले होते. पुढील पालनपोषण त्यांचे थेक्कमपट्टी गावातच झाले, जेथे त्यांचे आजी-आजोबा आणि त्यांच्या दोन बहिणींनी त्यांना यातून सावरले. त्यानंतर पापाम्मल यांनी वयाच्या 30 व्या वर्षी स्वतःसाठी शेतजमीन खरेदी केली आणि तेव्हापासून सातत्याने तेथे त्या शेती करत आल्या आहेत.
आश्चर्यजनक प्रवास
कालौघात शेती हेच त्यांचे कार्यक्षेत्र ठरले आहे. रितसर शिक्षण प्राप्त न करताही त्यांनी शेतीमधील बारकावे शिकून घेतले. त्यांचे हेच प्राविण्य आता अनेक शिक्षित लोक कृषी शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहत असेच समजून घेत आहेत. एक सामान्य शेतकरी महिला ते सेंद्रीय शेतीत योगदान देण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अत्यंत आश्चर्यजनक आणि रंजक आहे.
मेहनतीबरोबरच मार्गदर्शनाचाही ध्यास

वयाच्या 107 व्या वर्षीही पापाम्मल पहाटे साडेपाच उठतात. घरातील सर्व कामे आटोपल्यावर त्या स्वतःच्या शेतीच्या दिशेने खांद्यावर कृषी अवजारे घेऊन बाहेर पडतात. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शेतामध्येच त्या काम करतात. केळीच्या पिकांवर अम्मांचे विशेष प्रेम आहे. तसेच त्या तामिळनाडूत कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही त्या सेंद्रीय शेतीचे व्यावहारिक धडे देतात. यादरम्यान अम्मा स्वतःच्या शेतात शेतीचे काम करत विद्यार्थी आणि अन्य शेतकऱयांसोबत स्वतःचे अनुभव मांडतात. सेंद्रीय शेतीसाठी काय करावे आणि काय करू नये हे देखील त्या सांगतात. तसेच चांगले आणि पोषक पिकांच्या पद्धतींविषयी सर्वांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करत असतात.
तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश
सेंद्रीय शेतीबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल केवळ गावातील नवी पिढीच नव्हे तर कृषी क्षेत्रातील जाणकारही त्यांना सलाम करतात. पापाम्मल यांच्याकडून शेतामध्ये करण्यात येणारी मेहनत पाहून कृषी क्षेत्रातील विद्यार्थीही अचंबित होतात. कामासाठी पापाम्मल शेतमजूर ठेवत नसल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटते. अनेकदा प्रेमाने पापाम्मल विद्यार्थ्यांची गळाभेट घेत त्यांचे कौतुकही करतात. ‘मी इतकी वृद्ध होऊनही दिवसभर काम करते तर मग तुम्ही कसे थकता, चला खूप झाले आता माझ्यासोबत काम करा’ असे त्या तरुण विद्यार्थ्यांना सांगत असतात.
दीर्घायूचे रहस्य काय?
पापाम्मल यांचा आहार आणि कामकाजाची जीवनशैली हीच त्यांच्या दीर्घायूचे रहस्य असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. त्यांच्या बहिणीचे नातू आर. बालासुब्रमण्यम यांनी अम्मा यांना मटण बिर्याणी आणि विविध प्रकारच्या पालेभाज्या पसंतीचा आहार असल्याचे सांगितले आहे. पापाम्मल कधीच निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची संधी गमावत नाहीत. ते स्वतःचे भोजन मातीच्या भांडय़ांमध्ये तयार करतात आणि केळीच्या पानावरून तो ग्रहण करतात. त्या कधीच चहा किंवा कॉफी पित नाहीत. या वयातही नव्या गोष्टी शिकण्याप्रकरणी पापाम्मल यांचा हात कुणीच धरू शकत नाही.
शेतामध्ये नवनवे प्रयोग
पारंपरिक पद्धतीने शेती करत आली असल्याने यालाच सेंद्रीय शेती म्हणतात हे माहितच नव्हते असे अम्मा यांचे म्हणणे आहे. शेतकऱयांच्या एका बैठकीत त्यांनी एकेदिवशी सेंद्रीय शेतीबद्दल ऐकले होते. त्यानंतर त्या स्वतःच्या शेतामध्ये नवनवे प्रयोग करू लागल्या. रसायने आमची पिके, माती आणि लोकांच्या आरोग्यासाठी चांगली नाहीत. याचमुळे आम्ही सेंद्रीय शेतीच्या दिशेने वळलो आहोत. यात नवे प्रयोग केले आहेत. हे प्रयोग यशस्वी आणि लोकप्रिय राहिले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
इतरांनाही फायदा…
पापाम्मल यांचे हे प्रयोग त्यांच्या शेतजमिनीपुरतेच मर्यादित नाहीत. तर अन्य शेतकऱयांकडूनही सेंद्रीय शेतीची धारणा फैलावण्यासाठी वापरण्यात येत आहे. यातून शेतकऱयांना सेंद्रीय शेतीविषयी माहिती मिळत असून अनेक शेतकरी हा मार्ग चोखाळत आहेत. अधिक विचार न करणार नाही, तर जे करण्याचा निर्णय घेतला आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. हाच विचार करून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पापाम्मल यांनी सांगितले आहे.
100 वर्षांपेक्षा अधिक वय असूनही मला पद्मश्री पुरस्कारासाठी पात्र समजण्यात आल्याने मी अवाप् झाले. मला याबद्दल गर्वही वाटतो. मी अद्याप या वयातही शेतीशी निगडित कामे करते. मला अद्याप यातच आनंद मिळतो आणि शेतीबद्दल जाणून घेण्यासाठी दरदिनी 50 ते 100 लोक माझ्याकडे येत असतात असे त्या सांगतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक देखील समोरच्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरू शकते.









