26 घरांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण : नुकसानभरपाई रक्कम बँक खात्यात जमा होणार
बेळगाव : यंदा झालेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यात आतापर्यंत 107 घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी 26 घरांचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार तहसीलदार कार्यालयातून संबंधितांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होते. नुकसानग्रस्त कुटुंबीयांना शासनाकडून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने एखादे घर पूर्णपणे पडल्यास संबंधितांना 5 लाख रुपयांची भरपाई दिली होती.
त्यानंतर भरपाईची रक्कम कमी करून ती अडीच लाखांवर आणण्यात आली. मात्र सध्या पूर्णपणे घर कोसळल्यास 1 लाख रुपये भरपाई दिली जात आहे. काही ठिकाणी घर कोसळून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होते तर काही ठिकाणी जीवितहानी होण्याच्या दुर्घटनादेखील घडतात. जनावरांचा घराच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्यास पशुसंगोपन खात्याकडून पंचनामा करून घेणे गरजेचे असते. एकंदरीत तलाठी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अभियंत्यांनीदेखील आपला अहवाल तहसीलदार कार्यालयाला दिला पाहिजे.
यंदा शहर आणि तालुक्यात 107 घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला उपलब्ध झाली आहे. मात्र यापैकी केवळ 26 घरांचे पंचनामे उरकून संबंधितांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात अर्ज आले आहेत. त्यानुसार तहसीलदार कार्यालयातून नुकसानग्रस्तांचे आधारकार्ड, बँक पासबुक व इतर कागदोपत्रांची पूर्तता झाल्यानंतर भरपाईची रक्कम जमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्णपणे घर कोसळल्यास 1 लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाणार आहे. तर घरांच्या भिंती किंवा इतर भाग कोसळून नुकसान झाल्यास अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर आधारित भरपाई दिली जाणार आहे.
नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे काम सुरू…
यंदा पावसाळ्यात तालुक्यात विविध ठिकाणी 107 घरांची पडझड झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापैकी 26 घरांच्या पंचनाम्याची कामे पूर्ण करून भरपाईच्या रकमेसाठी अर्ज आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
-सुभाष असोदे, द्वितीय दर्जा तहसीलदार, बेळगाव









