आष्टा / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील बावची येथे १०६ वर्षे पूर्ण केलेल्या बावची पश्चिम भाग सेवा सोसायटीच्या विस्तारित नुतन इमारतीचे उदघाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. इतक्या वर्षांच्या इतिहासात प्रतिकूल परिस्थितीत संस्थेचे कामकाज स्व. भाऊसाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे झाले असून संस्थेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन या दोन्ही पदावर महिलांना संधी देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच संस्था आहे, हे अभिमानास्पद आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी बोलताना केले.
संस्थेची यशस्वी वाटचाल होत असताना सभासद शेतकर्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्यासाठी नवनवीन उपाययोजना करणे तसेच त्यांना आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. बावची गाव मागील दोन पिढ्यांच्या कष्टाच्या जोरावर आणि शैक्षणिक वाटचालीमुळे विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. हे गाव नक्कीच आपली एक वेगळी ओळख निर्माण करेल. असेही पालकमंत्री म्हणाले.









