बेळगावातील वर्धापनदिन कार्यक्रमात समूहप्रमुख डॉ. किरण ठाकुर यांचे प्रतिपादन
समाज प्रबोधन, लोकशिक्षण आणि अन्यायाविरुद्ध लढा या हेतूने सुरू झालेल्या तरुण भारत वृत्तपत्राने 106 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त बेळगाव येथे निमंत्रितांसाठी आणि तरुण भारत परिवारातील सदस्यांसाठी दोन दिवस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध विभागातील प्रमुखांचा सत्कारही करण्यात आला. याची ही सचित्र झलक…
बेळगाव
स्वातंत्र्यप्राप्तीची तळमळ, अन्यायाविरुद्ध झुंज आणि समाज प्रबोधन या हेतूने 1919 मध्ये ‘तरुण भारत’ची सुरुवात झाली. मासिक, साप्ताहिक आणि नंतर दैनिक असा प्रवास करत तरुण भारतने 106 वर्षे पूर्ण केली. या प्रवासामध्ये आमचे पत्रकार, वार्ताहर, विक्रेते, जाहिरातदार, वाचकांच्या बरोबरीने कायम आमच्यासोबत राहिले. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगातील कोणत्याही वृत्तपत्राशी ‘तरुण भारत’ स्पर्धा करू शकते, याचे श्रेय माझ्या परिवारातील सदस्यांनाच जाते, असे भावपूर्ण मनोगत ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
‘तरुण भारत’च्या 106 व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार दि. 24 व शनिवार दि. 25 रोजी झालेल्या कार्यक्रमात डॉ. किरण ठाकुर बोलत होते. शुक्रवारी ऑर्चर्ड रिसॉर्ट येथे निमंत्रितांसाठी तर शनिवारी गणाधीश लॉन येथे वार्ताहर व ‘तरुण भारत’ परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. व्यासपीठावर ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर, संचालक सई ठाकुर-बिजलानी उपस्थित होत्या.
डॉ. किरण ठाकुर म्हणाले, ‘तरुण भारत’ला वैभवशाली परंपरा आहे. संस्थापक बाबुराव ठाकुर यांनी शिक्षण सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. आईकडून 100 रुपये घेऊन मशीन खरेदी केली आणि ‘तरुण भारत’ची मुहूर्तमेढ रोवली. तरुणांनी चालविलेले वृत्तपत्र असेच त्याचे कायम स्वरुप राहिले. 106 वर्षांत ‘तरुण भारत’ वर अनेक आघात झाले. अनेक वादळांना ‘तरुण भारत’ने तोंड दिले. परंतु अन्यायाविरुद्ध झुंज व लोकशिक्षण हे ब्रीद आम्ही कधीही सोडले नाही, असेही ते म्हणाले.
निर्भेळ व निर्भीड वातावरण लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ‘तरुण भारत’मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराने, वार्ताहराने हा निर्भीडपणा जपला आहे. ‘तरुण भारत’ने आधुनिक काळाशी जुळवून घेत नवतंत्रज्ञान आत्मसात केले आहे. आज ठाकुर परिवाराची चौथी पिढी वृत्तपत्र क्षेत्रात सक्रिय झाली आहे. ती उत्तम काम करत आहे, असे गौरवोद्गारही डॉ. किरण ठाकुर यांनी काढले.
शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात ‘तरुण भारत’च्या बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सोलापूर या आवृत्तींमधील संपादकीय, रिपोर्टिंग, जाहिरात, वितरण अशा विविध विभागांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय दरवर्षी ज्यांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ध्वजारोहणाचा मान दिला जातो त्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात बेळगाव तालुक्यातील वार्ताहर तसेच खानापूर, निपाणी येथील कार्यालय प्रमुख व जाहिरात विभागप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने अध्यक्ष शिवाजी राजगोळकर यांचाही डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बेळगाव रिपोर्टिंग विभागातील प्रदीप कुलकर्णी यांनी ‘तिन्ही लोक आनंदाने, भरून गाऊ दे’ हे गीत सादर करून टाळ्या मिळविल्या.
तरुण भारतने स्वाभिमानाचा बाणा सोडला नाही
स्वागत व प्रास्ताविक करून शुक्रवारी सई ठाकुर-बिजलानी यांनी सूत्रसंचालन केले. शनिवारी स्वागत करताना सई ठाकुर-बिजलानी म्हणाल्या, एखादी वास्तू, व्यक्ती, संस्था, शतक पूर्ण करते तेव्हा ती मोठा इतिहास जपत असते. ‘तरुण भारत’ त्याला अपवाद नाही. आज 106 वर्षांच्या कालावधीत ‘तरुण भारत’ने अनेक वादळांना तोंड दिले. परंतु आपला स्वाभिमानाचा बाणा सोडलेला नाही. हा सर्व प्रवास केवळ ‘तरुण भारत’मधील सदस्यांमुळेच सोपा झाला आहे. आजपर्यंत तुम्ही आमच्यासोबत होतात, आहात आणि यापुढेही असाल, असा विश्वास मला वाटतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सुभेदार यांनी केले.









