स्वत:च्या भावाच्या हत्येचा होता आरोप
वृत्तसंस्था/ मालदा
पश्चिम बंगालच्या मालदा येथील तुरुंगात 36 वर्षांपर्यंत शिक्षा भोगल्यावर 104 वर्षीय वृद्धाची मुक्तता करण्यात आली आहे. मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला होता. न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात जन्मलेले रसिक्त चंद्र मंडल हे 1988 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी दोषी आहेत. त्यांनी जमीन वादातून स्वत:च्या भावाची हत्या केली होती. न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. एक वर्षासाठी त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. जामिनाचा कालावधी संपल्यावर त्यांना परत तुरुंगात जावे लागले होते. रसिक्त चंद्र मंडल यांचा जन्म 1920 मध्ये झाला होता.
किती वर्षे तुरुंगात काढली हेच मला आता आठवत नाही. हा तुरुंगवास कधीच न संपणारा ठरेल अशी भीती होती. परंतु आता मी बाहेर आलो आहे. आता अंगणातील छोट्या-छोट्या रोपांची देखभाल करणार आहे. आता कुटुंबासोबत राहू इच्छितो असे रसिक्त मंडल यांनी म्हटले आहे.









