सर्वसाधारणपणे वयाच्या 60 वर्षांनंतर लोक निवृत्त होत घरात आराम करणे पसंत करत असतात. परंतु काही लोक या वयानंतरही काम करणे पसंत करतात. मग शरीराची साथ कमी झाल्यावर शारीरिक कष्टाचे काम निवडणे टाळतात. परंतु शिकागो येथील 104 वर्षीय महिलेने अनोखा विश्वविक्रम करत वयाचे बंधन आपण मानत नसल्याचे दाखवून दिले आहे.
डोर्थी होफनर या 13,500 फुटांच्या उंचीवरून उडी घेत जगातील सर्वाधिक वयाच्या स्कायडायव्हर ठरल्या आहेत. डोर्थी यांनी अलिकडेच ओटावाच्या स्कायडाइव्ह शिकागोमध्ये हे स्काय सर्फिंग केले आहे. स्कायडाइव्ह शिकागोचे अधिकारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून डोर्थी यांच्या डायव्हिंगला एका विक्रमाच्या स्वरुपात नोंदविण्यासाठी काम करत आहेत. डब्ल्यूएलएस-टीव्हीनुसार आतापर्यंत हा विक्रम स्वीडनच्या लिनिया इंगेगार्ड लार्सन यांच्या नावावर होता. त्यांनी तो मे 2022 मध्ये नोंदविला होता आणि तेव्हा त्या 103 वर्षांच्या होत्या.
डोर्थी यांनी यापूर्वी वयाच्या 100 व्या वर्षी स्कायडायव्हिंग केले होते. स्वत:च्या वॉकरला विमानात सोडून त्या स्कायडायव्हिंगसाठी प्रतीक्षा करणाऱ्या अन्य लोकांमध्ये सामील होण्यासाठी जिन्यावरून चढल्या. पहिल्यांदा अवघड वाटल्याने डाइव्ह करण्यासाठी मला ढकलावे लागल्याचे डोर्थी यांनी सांगितले आहे.
जमिनीवर उतरताच पकडला वॉकर
या नव्या विक्रमावेळी डोर्थी अत्यंत शांत अन् निडर होत्या. त्यांनी एकूण 7 मिनिटे आकाशात स्कायडाइव्ह करत घालविली आहेत. त्यांचा पॅराशूट हळूहळू जमिनीवर येऊ लागताच उत्साही लोकांची गर्दी त्यांची प्रतीक्षा करत होती. खाली उतरताच जल्लोष करण्यापूर्वी त्या स्वत:चा वॉकर घेऊन आल्या. माझे कुटुंब अत्यंत प्रेमळ आहे, आकाशात मिळालेल्या आनंदापेक्षा अधिक चांगले काहीच असू शकत नाही असे डोर्थी यांनी सांगितले आहे. डोर्थी यांना आता हॉट बलूनची सवारी करायची आहे.









