213 सैनिकांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक , 729 सैनिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी यावषी शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा पुरस्कार प्राप्त 1,037 सैनिकांची नावे जाहीर केली. यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त अग्निशमन सेवा, होमगार्ड सेवा आणि नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सन्मानित करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने एका सैनिकाला राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच 213 सैनिकांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि 729 सैनिकांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक देऊन सन्मानित केले आहे.
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या 1,037 सैनिकांच्या नावांच्या यादीत जम्मू काश्मीर पोलिसांचे 31 जण, उत्तर प्रदेश पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे प्रत्येकी 17, छत्तीसगडमधील 15, मध्यप्रदेशमधील 12, झारखंड, पंजाब आणि तेलंगणामधील प्रत्येकी 7 जवानांचा समावेश आहे. तसेच सीआरपीएफमधील 52 जवानांसोबतच 14 एसएसबी कर्मचारी, 10 सीआयएसएफ कर्मचारी, 6 बीएसएफ कर्मचारी आणि उर्वरित इतर राज्यांच्या पोलीस सेवेतील आहेत.
अतिकच्या मुलाचा सामना करणाऱ्या पोलिसांचा सन्मान
उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर मोहम्मद गुलाम यांना चकमकीत ठार करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी असद आणि गुलाम यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस होते. गेल्यावषी पोलीस कोठडीत अतिक आणि अशरफ अहमद यांची हत्या होण्यापूर्वी असद अहमदची चकमक झाली होती. 13 एप्रिल 2023 रोजी झाशी येथे झालेल्या चकमकीत असद आणि मोहम्मद गुलाम यांना ठार करणाऱ्या एसटीएफ पथकाचे 6 सदस्य आणि इतर पोलिसांसह एकूण 17 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळणार आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलातील 17 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.









