24 तासांत 9 युद्धनौकांचीही घुसखोरी : चीन अन् अमेरिकेत चर्चा
वृत्तसंस्था/ तैपेई
तैवानमध्ये मागील 24 तासांमधे चीनच्या 103 लढाऊ विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी घुसखोरी आहे. अशाप्रकारच्या कृत्यांद्वारे चीन या भागातील तणा वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
चीनची 40 लढाऊ विमाने रविवार आणि सोमवारी दोन्ही देशांमधील मीडियन लाइन ओलांडून तैवानमध्ये शिरली. यापूर्वी शनिवार अन् रविवारदरम्यान 63 लढाऊ विमानांनी तैवानमध्ये घुसखोरी केली होती. याचबरोबर 9 युद्धनौकांनी देखील तैवानच्या हद्दीत प्रवेश केला होता.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी चीनचे विदेशमंत्री वांग यी यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर चीनकडून ही घुसखोरी करण्यात आली होती. माल्टा या देशात दोन दिवस चाललेल्या बैठकीत चीनच्या विदेशमंत्र्यांनी तैवानचा मुद्दा उपस्थित केला होता. स्पाय बलूननंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये आलेला तणाव दोन्ही देश दूर करू पाहत आहेत. अशा स्थितीत जेक सुलिवन आणि वांग यी यांच्यात चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. परंतु दोघांमधील चर्चेचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
जॅक सुलिवन अन् चीनच्या विदेश मंत्र्यांदरम्यान युक्रेन युद्ध, तैवान अन् जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचा दावा व्हाइट हाउसने केला आहे. दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तैवान लाल रेषा असून अमेरिका ती ओलांडू शकत नसल्याचे चीनने म्हटले आहे.
मागील आठवड्यातच चीनने तैवानवर कब्जा करून त्याला स्वत:मध्ये विलीन करण्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट जारी केला होता. याकरता चीन किनारी क्षेत्र फुजियान आणि तैवानमधील अंतर कमी करू इच्छितो. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटी आणि स्टेट कौन्सिलने तैवानवर कब्जा करत तेथे स्वत:ची सत्ता निर्माण करण्यासाठी फुजियानला प्रॅक्टिस झोनमध्ये बदलले आहे.









