व्हर्च्युअल कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची राजस्थानमध्ये उपस्थिती
वृत्तसंस्था/बिकानेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 103 पुनर्विकसित रेल्वेस्थानकांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. सदर स्थानके ‘अमृत भारत स्टेशन योजने’चा एक भाग असून त्याचा उद्देश भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देणे आहे. या योजनेचे उद्दिष्ट देशभरातील 1,300 हून अधिक रेल्वेस्थानकांना प्रगत प्रवासी सुविधा आणि प्रादेशिक वास्तुकला एकात्मतेसह आधुनिक वाहतूक केंद्रांमध्ये रुपांतरित करणे हा आहे. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी 4,850 कोटी रुपयांचे 7 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प समर्पित केल्यामुळे लष्करी गतिशीलता सुधारेल आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी उद्घाटन केलेल्या 103 अमृत भारत स्थानकांमध्ये उत्तर प्रदेशातील 19, गुजरातमधील 16 तर महाराष्ट्रातील 15 स्थानकांचा समावेश आहे. अंदाजे 1,100 कोटी रुपये खर्चून पुनर्विकास केलेली ही 103 स्थानके विविध राज्यांमध्ये 86 जिल्ह्यांमध्ये आहेत. यामध्ये आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रमुख आणि लहान स्थानकांचा समावेश आहे. या विकासकामांतर्गत दर्जेदार प्रवासी सुविधा, दिव्यांगजनांसाठी सुलभता आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध डिझाईन प्रदान करण्यासाठी स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. देशाने या आधुनिकीकरण झालेल्या स्थानकांना ‘अमृत भारत स्थानके’ असे नाव दिले आहे. आज यापैकी 100 हून अधिक अमृत भारत स्टेशन्स तयार आहेत. या अमृत भारत स्थानकांवर ‘विकासासोबतच वारसा’ हा मंत्र स्पष्टपणे दिसून येतो, असे पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.
विविध सुविधा उपलब्ध
अमृत भारत स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. स्थानके शहराची केंद्रे म्हणून विकसित केली गेली. येथे छतावरील प्लाझा, शॉपिंग झोन, विश्रांती कक्ष, ऐसपैस मोकळे क्षेत्र इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय, ‘वारसाही, विकासही’अंतर्गत स्थानिक वास्तुकलेपासून प्रेरित एक स्टेशन इमारत बांधण्यात आली आहे. स्थानकांवर स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन दरवाजे, सुसज्ज पार्किंग, लिफ्ट, एस्केलेटर, प्रतिक्षालय, प्रवासी, अपंगांसाठी अनुकूल सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. बहु-पद्धती कनेक्टिव्हिटीच्या एकात्मिकतेमुळे अमृत भारत स्थानके या प्रदेशात सामाजिक-आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र म्हणून उदयास येतील. स्थानकांच्या डिझाईनमध्ये ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. याचा पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील 15 स्थानके…
आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, इतवारी जंक्शन (नागपूर), परेल, सावदा, शहाद, वडाळा रोड,
बिकानेर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदींनी नवीन बिकानेर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तसेच, 58 किमी लांबीच्या चुरु-सदरपूर रेल्वेमार्गाचा पायाभरणी समारंभही करण्यात आला. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींनी सुरतगड-फलोदी (336 किमी), फुलेरा-डेगाना (109 किमी), उदयपूर-हिम्मतनगर (210 किमी), फलोदी-जैसलमेर (157 किमी) आणि समदडी-बारमेर (129 किमी) या प्रमुख रेल्वे विभागांचे विद्युतीकरण समर्पित केले.









