अमृतसर
जालियाँवाला बागेतील नृशंस नरसंहाराला 101 वर्षे उलटूनही 13 एप्रिल 1919 रोजी इंग्रजांच्या गोळीबारात किती जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते हेच कळलेले नाही. जिल्हा प्रशासनाने अलिकडेच जालियाँवाला बागेत हुतात्मा झालेल्या 492 जणांची यादी स्वतःच्या संकेतस्थळावर प्रसारित केल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे.
दुरुस्तीसह राष्ट्रीय स्तरावर अशी एक यादी प्रसिद्ध केली जावी अशी मागणी इतिहासकार आणि जालियाँवाला बाग शहीद परिवार समितीच्या सदस्यांनी केली आहे. या ऐतिहासिक घटनेत हुतात्मा झालेल्या लोकांच्या संख्येवरून निर्माण झालेला गोंधळ कायमस्वरुपी दूर करण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे. जालियाँवाला बागेतील हुतात्म्यांच्या अनेक याद्या आहेत. आमच्या हुतात्म्यांच्या संख्येबद्दल अचूक माहिती नसणे दुर्दैवी असल्याचे उद्गार समितीचे अध्यक्ष महेश बहल यांनी काढले आहेत.
निशस्त्रांवर गोळीबार
ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायरच्या गोळीबाराच्या आदेशानंतर त्या दिवशी शांततेत निदर्शने करणाऱया भारतीयांवर 1,650 गोळय़ा झाडल्या गेल्या होत्या. पंजाबचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर ओ डायर यांना पाठविण्यात आलेल्या अहवालात मृतांची संख्या 200 ते 300 दरम्यान असल्याचे कळविण्यात आले होते. तर तत्कालीन मुख्य सचिवांनी 290 जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. हा आकडा 501 असल्याचा अमृतसर सेवा समितीचे म्हणणे आहे.
आरटीआयनुसार 515 जण हुतात्मा
समितीच्या माहितीनुसार 13 एप्रिल 1919 रोजी 1,050 जणांनी हौतात्म्य पत्करल्याचे बहल म्हणाले. 2009 साली माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत 501 जण हुतात्मा झाले होते. यानुसार गोळीबारात 501 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर 14 जणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला होता.









