एकाचवेळी विमानातून उडी घेत स्कायडायव्हिंग
कधी 100 हून अधिक लोकांना एकाचवेळी विमानांमधून उडी घेताना पाहिले आहे का? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात 60-80 वयोगटातील 101 वृद्धांनी आकाशात असे दृश्य रचले की पाहणारे थक्कच झाले आहेत. हा स्काय डायव्हिंग इव्हेंट अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आयोजित करण्यात आला होता, यात ‘स्काय डायव्हर्स ओव्हर सिक्स्टी’ नावाच्या समुहाने आकाशात कमालीचे फॉर्मेशन्स तयार करत दोन विश्वविक्रम मोडीत काढले आहेत. सोशल मीडियावर आता या वृद्धांचे कौतुक होत आहे. ज्या वयात लोक हातात काठी घेतात, त्या वयात या वृद्धांनी खरोखरच कमाल करून दाखविली असल्याचे सोशल मीडिया युजर्सकडून म्हटले जात आहे.
स्कायडायव्हर्स ओव्हर सिक्स्टी समुहाने स्कायइाव्ह पेरिसमध्ये या विश्वविक्रमी कामगिरीचे आयोजन केले होते. 101 वृद्धांनी स्वतःच्या चौथ्या प्रयत्नात यशस्वीपणे आकाशात फॉर्मेशन्स तयार केली आहेत. यासंबंधीचा मागील विक्रम 2018 मध्ये इलिनोइसमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 75 स्कायडायव्हर्सच्या एका समुहाकडून नोंदविण्यात आला होता.

कॅलिफोर्नियातील समुहाने यापूर्वी 2022 मध्ये विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या समुहाच्या सदस्यांना खराब हवामानामुळे फॉर्मेशन्स तयार करण्यास अपयश आले होते.
अधिकृत प्रमाणपत्रासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून कामगिरीशी संबंधित रिकॉर्ड जमविले जात असल्याची माहिती स्कायडायव्हिंग टीमचे आयोजक डेन ब्रोडस्की-चेनफेल्ड यांनी दिली आहे. केवळ तुमचे वय 60 वर्षांहून अधिक असल्याने तुम्ही कुठल्याच गोष्टीत भाग घेऊ नये असा अर्थ काढला जाऊ नये. वयाच्या या टप्प्यात देखील अनेक प्रकारच्या शक्यता पडताळून पाहता येतात. मी स्कूबा डाइव्ह करतो, स्की करत होतो असे 75 वर्षीय प्रेडिकर विंसर यांनी सांगितले आहे.









