डॉक्टरही चकीत : वाढत्या वयातही उत्साह कायम
इटलीतील 101 वर्षीय मारिया ओरसिंघेर यांचे नाव कोरोनायोद्धा म्हणून नोंदविण्यात आले आहे. 9 महिन्यांच्या कालावधीत तीनवेळा कोरोनाबाधित होऊनही प्रत्येकवेळा मारिया यांनी या जीवघेण्या विषाणूवर मात करत खरोखरच आम्हाला चकीत केल्याचे उद्गार डॉक्टरांनीच काढले आहेत. मारिया यांना सर्वप्रथम फेब्रुवारीत कोरोनाची लागण झाली होती.
मारिया यांना फेब्रुवारीत सोंडालो येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा तेथे मोठय़ा संख्येत कोरोनाबाधित वृद्धांचा मृत्यू होत होता. आम्हीही प्रचंड घाबरलो होतो. आई बरी झाल्यावर डॉक्टरांनी या वयाची व्यक्ती कोरोनातून इतक्या जलद बरी होताना पाहिले नव्हते, असे सांगितल्याची माहिती त्यांची मुलगी कार्ला यांनी दिली आहे.
मारिया यांना श्वसनाचा त्रास नव्हता तसेच तापही अधिक नव्हता. जुलै महिन्यात त्यांनी स्वतःचा 101 वाढदिवस साजरा केला होता. सप्टेंबरमध्ये पुन्हा संक्रमित झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये तिसऱयांदाच त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सध्या त्या घरी आराम करत आहेत.









