देश-विदेशात जय्यत तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यासोबतच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातूनही त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज व्हा, असे ट्विट यूएनमधील भारताच्या मिशनने केले आहे. याचदरम्यान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही ‘मन की बात’साठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. मन की बातमध्ये स्वच्छता, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि विकास अशा अनेक मुद्यांना महत्त्व देण्यात येत असल्यामुळे आज अनेक समाजातील लोक पुढे येऊन त्यांच्यावर काम करत असल्याचे गेट्स यांनी म्हटले आहे.
‘मन की बात’चा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी यातील एक भाग लाईव्ह केला जातो. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन नेटवर्कने हा 30 मिनिटांचा भाग प्रसारित केला जातो. 22 भारतीय भाषा आणि 29 बोलींव्यतिरिक्त इंग्रजी वगळता 11 परदेशी भाषांमध्येही मन की बात कार्यक्रम सर्वदूर पोहोचवला जात आहे. 26 एप्रिल रोजी प्रसार भारतीने 100 वा भाग साजरा करण्यासाठी एका कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीट जारी केले.









