कोटा / वृत्तसंस्था :
राजस्थानच्या कोटा येथील जेके लोण रुग्णालयातील 100 नवजातांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी काँग्रेस सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. रुग्णालयातील मुलांच्या मृत्यूप्रकरणी सरकार संवेदनशील असून याप्रकरणी राजकारण होऊ नये असे गेहलोत यांनी म्हटले आहे. तर भाजपसह बसप अध्यक्षा मायावती यांनीही या मुद्दय़ावर काँग्रेसवर प्रखर टीका केली आहे.
डिसेंबर महिन्यात एकाच रुग्णालयात 100 मुलांचा मृत्यू झाला असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याची दखल घेत राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांच्याशी चर्चा केली आहे. याप्रकरणी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत असा संदेश सोनियांनी पांडे यांच्या माध्यमातून दिल्याचे समजते.
कोटा जिल्हय़ातील रुग्णालयात डिसेंबरच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये किमान 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. 23-24 डिसेंबर रोजी 48 तासांमध्ये 10 मुलांना जीव गमवावा लागल्याने मोठा गदारोळ झाला होता. पण रुग्णालय प्रशासनाने 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.
याचदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही मुख्यमंत्री गेहलोत यांना नवजातांच्या मृत्यूप्रकरणी पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निश्चितणे अधिक मुलांना जीव गमवावा लागल्याचे म्हणत हर्षवर्धन यांनी राज्य सरकारचा दावा खोडून काढला आहे.
लोकसभा अध्यक्षांचा मतदारसंघ
लोकसभा अध्यक्ष आणि कोटाचे खासदार ओम बिर्ला यांनी मुलांच्या मृत्यूप्रकरणी गंभीर चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री गेहलोत यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. राज्य सरकारने याप्रकरणी संवेदनशीलता दाखवून वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे बिर्ला यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून टीकास्त्र
एका महिन्यात 100 नवजात शिशूंचा मृत्यू झाल्यावरही राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना कुठलाच प्रश्न विचारला जात नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांना जाता येणार नाही एवढय़ा अंतरावरही कोटा नाही. काँग्रे सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 100 हून अधिक नवजातांनी जीव गमावल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे. काँग्रेसशासित राजस्थानात सुमारे 100 नवजातांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत दुःखद आहे. तेथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार याप्रकरणी उदासीन, असंवेदनशील आणि बेजबाबदार ठरले असून हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची टीका बसप अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.
सोनिया गांधी- प्रियंका वड्रा लक्ष्य
कोटा येथील 100 हून अधिक मुलांच्या मृत्यूप्रकरणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपत्य गमावण्याचे दुःख सहन करणे मातांना अवघड असते. सोनिया गांधी आणि प्रियंका वड्रा या महिला असून त्यांना या मातांचे दुःख समजत नसल्याची टीका योगींनी केली आहे. प्रियंका यांनी उत्तरप्रदेशात राजकीय नाटय़ करण्यासाठी राजस्थानात गरीब मातांची भेट घेणे योग्य ठरले असते. पण प्रियंका वड्रा यांना केवळ राजकारण करायचे असल्याचे म्हणत योगींनी त्यांना लक्ष्य केले आहे.









