सांगली :
सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत थकीत पाणीपट्टी बिल एकरकमी भरल्यास, त्यावरील व्याज व विलंब शुल्क १०० टक्के माफ करण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जर नागरिकांनी नोटिशीप्रमाणे थकीत बिल वेळेत भरले नाही, तर नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयुक्त सत्यम गांधी यांनी आवाहन केले आहे.
सन २०१९ मधील महापूर आणि त्यानंतर झालेल्या कोविड १९ महामारीमुळे महापालिकेच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे मार्च २०२३ अखेर थकबाकाची रक्कम प्रचंड वाढली आहे.
- १ एप्रिल २०२५ रोजीची स्थिती
थकीत पाणीपट्टी रक्कम : ४३.६४ कोटी, व्याज व विलंब शुल्क: २३.२४ कोटी, एकूण थकबाकी : ६६.८८ कोटी.
महासभेने ठराव क्र. ५७७ २० जुलै २०२३ नुसार, थकीत वसुलीस चालना देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. शासनाने त्यास मान्यता दिली असून, यामुळे थकीत पाणीपट्टी रक्कम मोठ्या प्रमाणावर वसूल होण्याची अपेक्षा आहे.
- … तर १०० टक्के सूट
थकीत बिल एकरकमी भरल्यास व्याज व विलंब शुल्कात १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. यासाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. वेळेत वसुली झाल्यास पाणीपुरवठा व्यवस्थापन, देखभाल व नवे प्रकल्प सुलभ होणार आहेत. ऑनलाईन तसेच ठरावीक केंद्रांवर बिल भरण्याची सोय उपलब्ध केली आहे.
- विलंब झाल्यास नळ कनेक्शन तोडणार
नागरिकांनी आपली थकीत पाणीपट्टी बिले वेळेत भरून सहकार्य करावे. व्याज व विलंब शुल्क माफ करून दिलेली ही ऐतिहासिक संधी दवडू नये. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वेळेवर बिल भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
-सत्यम गांधी, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका








