राज्यात मराठी-कोकणी शाळा बंद होण्याचे प्रमाण जास्त
पणजी : मागील 2014 पासून म्हणजे गेल्या 10 वर्षात राज्यातील सुमारे 100 सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे, तर 1988 पासून आतापर्यंत म्हणजे 35 वर्षात गोव्यातील 384 सरकारी प्राथमिक शाळा बंद कराव्या लागल्या आहेत. शाळेतील मुले कमी-कमी होत गेल्याने त्या बंद करण्याची पाळी आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2014 मध्ये 822 सरकारी प्राथमिक शाळा होत्या. त्या 2016 मध्ये 800 झाल्या. तर 2017 मध्ये 780 पर्यंत त्यांची संख्या खाली आली. पुढे 2019 मध्ये त्यांची संख्या 742 झाली. त्यानंतर 2020-21 या दोन वर्षात कोरोनाचे संकट आल्यामुळे एकही शाळा बंद पडली नाही. नंतर 2022 मध्ये सरकारी प्राथमिक शाळांची संख्या आणखी घटली आणि ती 718 झाली. मराठी-कोकणी शाळा बंद होण्याचे प्रमाण जास्त आहे.
नवीन प्राथमिक शाळांसाठी 52 अर्ज
आगामी 2023-24 या शैक्षणिक वर्षात विविध भाषिक प्राथमिक शाळा सुऊ करण्यासाठी शिक्षण खात्याकडे एकूण 52 अर्ज आले असून त्यावर अहवाल मागवण्यात आला आहे. या शाळांची शक्याशक्यता तपासून पाहण्याचे काम संबंधित तालुका भाग शिक्षणाधिकारी कार्यालयावर सोपविण्यात आले आहे. गोव्यात मराठी, कोकणी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, तेलगू अशा विविध प्रादेशिक भाषेतील प्राथमिक शाळा चालतात. आता नव्याने आलेल्या अर्जामध्ये उर्दूसाठी एकूण 6 अर्ज समाविष्ट असून 21 कोकणी, 10 मराठी, 14 इंग्रजी, 1 हिंदी अशा भाषिक अर्जांचा समावेश आहे. राज्यात एकूण 1133 सरकारी प्राथमिक शाळा असून त्यात 718 सरकारी, 286 अनुदानित, 129 विनाअनुदानित शाळांचा अंतर्भाव आहे. त्यात मराठी 758, इंग्रजी 251, कोकणी 67, उर्दू 11, कन्नड 4, हिंदी 3 यांचा समावेश आहे.








