वृत्तसंस्था/ कोलकाता
यंदाच्या आयपीएलमध्ये अभूतपूर्व फॉर्ममध्ये असलेला अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने पुन्हा भारतासाठी खेळण्याचे स्वप्न सोडलेले नाही आणि अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये होणार असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळविण्याकरिता शक्य असेल ते सारे प्रयत्न आपण करेन, असे त्याने स्पष्ट केलेले आहे. विश्वचषकात खेळण्यास मी 100 टक्के तयार आहे, असेही त्याने म्हटले आहे.
कार्तिक 1 जून रोजी विश्वचषक सुरू होईल तोपर्यंत 39 वर्षांचा होईल. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात तो टीम इंडियातर्फे शेवटचा खेळला होता. या हंगामात आयपीएलमध्ये त्याने आपल्या फलंदाजीला एका नवीन स्तरावर नेले आहे आणि काही आश्चर्यकारक पॉवर हिटिंगचे प्रदर्शन घडविले आहे. आरसीबीच्या सर्वाधिक धावा काढलेल्या फलंदाजांमध्ये विराट कोहली (361 धावा) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (232 धावा) यांच्यानंतर 226 धावांसह तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘माझ्या आयुष्यातील या टप्प्यावर भारताचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोशट असेल. मी त्यासाठी खूप उत्सुक आहे. या टी-20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधीत्व करणे याहून मोठी बाब माझ्या आयुष्यात दुसरी काहीही नाही’, असे त्याने म्हटले आहे. मला असेही वाटते की, विश्वचषकासाठी सर्वोत्तम भारतीय संघ कोणता हे ठरवण्यासाठी तीन अतिशय स्थिर, प्रामाणिक व्यक्ती राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्या रुपाने उपलब्ध आहेत. त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा मी आदर करेन, असे कार्तिकने सांगितले आहे.
‘मी रसेल किंवा पोलार्ड नाही’
आंद्रे रसेल किंवा पोलार्डसारख्या पॉवर हिटिंगपेक्षा चेंडू अचूक वेळी फटकावण्यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या कार्तिकने एक खेळाडू म्हणून आपली ताकद समजून घेण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. ‘मी रसेल किंवा पोलार्ड नाही, ज्यांना एक तर चेंडू हुकतो किंवा ते चेंडूवर षटकार खेचतात’, असे तो म्हणाला.









