प्रतिनिधी / म्हापसा
राज्य मंत्रीपद पेक्षा उपसभापतीपदही तितकेच महत्त्वाचे आहे आणि पॅबिनेट दर्जाचे आहे. आपण हे पद मिळाल्याने नाराज आहे अशा अफवा आपल्या विरुद्ध पिकविण्यात आल्या. उलट आपण उपसभापती झाल्याने अती खुष झालो आहे. कारण हे पॅबिनेट दर्जाचे पद असून आपण विधानसभा चालविणार आहे. या पदामुळे आपल्यास आता म्हापसा मतदारसंघात अधिक लक्ष केंद्रीत करता येणार आहे. शिवाय प्रत्येक मतदारसंघाच्या समस्याकडे लक्ष देता येणार आहे. उपसभापती झाल्याने आता म्हापशात 100 टक्के लक्ष केंद्रीत करू अशी माहिती म्हापशाचे आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना उपसभापती म्हणाले की, आपल्या विरोधात अफवा झाल्या की आपण उपसभापतीचे खाते डावलले म्हणून. आपल्यास जेव्हा सांगण्यात आले की उपसभापतीचे पद आपल्यास देण्यात येणार आहे तेव्हा आपण गप्पच राहिलो कुणालाही काही सांगितले नाही. खूप जणांना वाटते की, उपसभापतीकडे खाते नसतात म्हणून हे पद महत्त्वाचे नाही असे अनेकांना वाटते मात्र ते पद महत्त्वाचे आहे. दोन आठवडे हे पद विधानसभा अधिवेशनामुळे पुढे गेले अशी माहिती आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली.
पक्षाच्या 24 जणांनी मला मतदान केले व विरोधी तिघे अलिप्त राहिले त्याचेही आपण आभारी आहे. हे पद अती महत्त्वाचे आहे. राज्याचे मंत्री, आमदार उपसभापतींना गोव्याची जनता सहज संपर्क करू शकते वा भेटू शकते, फोन करू शकते. मात्र इतर राज्यात उपसभापतीपद हे उच्च दर्जाचे आहे. ही आपल्यास एक चांगली संधी चालून आली आहे. याद्वारे राज्यातील जनतेला आपण काहीतरी करून दाखवू शकतो. विधानसभा आपण चालवून दाखवू शकतो. माझी आमदारकीची कारकीर्द सुरूच राहणार आहे. म्हापसावासियांना आपण सांगू इच्छितो की यात आम्हाला दोन फायदे होतात. एक म्हणजे आपल्यास आता सर्वकडे लक्ष घालता येईल आणि दुसरे म्हणजे म्हापसा मतदारसंघाकडे आपल्यास आता अधिक लक्ष घालता येईल. मंत्री म्हटले की खातीही खूप असतात. प्रत्येक मतदारसंघाच्या समस्याकडे लक्ष द्यावे लागते मात्र उपसभापती झाल्याने आपण आपल्या मतदारसंघात 100 टक्के लक्ष देऊ शकणार अशी माहिती उपसभापतींनी बोलताना दिली.
उपसभापतीपद म्हणजे पॅबिनेट दर्जा सारखे
आज आपल्यास उपसभापतीपद मिळाल्याने हा पॅबिनेट सारखा दर्जा आहे. यातून आपण सर्वकाही करू शकतो. राज्य पातळीवर सर्व लक्ष देता येईल. जाहीरनाम्यात आम्ही जे स्पष्ट केले आहे त्यापरीनी आम्ही जाणार आहोत. आम्हाला माहीत आहे भूमिगत वीज वाहिन्याचे काम सुरू आहे. 5 किलोमीटरचे काम झालेले आहे. याकामी चार मशीने घातलेली आहे अन्य मशीने याकामी येणार असून एकूण 7 मशीने यासाठी काम करणार आहेत अशी माहिती यावेळी आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. हे काम खोदून ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होईल त्यानंतर त्याची तपासणी असणार आहे. पावसाळा संपल्यानंतर काम मोठय़ा उत्साहाने हाती घेणार आहे. सरकारच्या पैशाचा वायफळ खर्च नको याकडे आम्ही लक्ष देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रवींद्र भवनासाठी 2 जागांची पाहणी
रवींद्र भवनासाठी दोन जागेची पाहणी केली असून यातील एकावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी दिली. दोन्ही कोमुनिदादच्या जागा असून त्या म्हापशाच्या बॉर्डरवर आहेत. विविध खात्याच्या अधिकाऱयांनी याची पाहणी केली आहे. सर्वांनाच वाटते की रवींद्र भवन म्हापशातच पाहिजे मात्र इतर गोष्टीही लक्षात घ्यायला पाहिजेत. पार्किंग, रस्ता अरुंद आदी गोष्टींचा विचारही व्हायला हवा. जर आम्ही हमरस्त्याची बाजू पाहिल्यास म्हापशातच नव्हे तर इतर सर्वांचा विचार करून त्यादृष्टीने रवींद्र भवनाची उभारणी व्हायला हवी अशी माहिती उपसभापतीनी दिली.
म्हापशात ग्रंथालय प्रकल्प हाती घेणार
आम्ही लायब्ररी प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले असून त्या प्रकल्पाचे काम येत्या चार दिवसात हाती घेण्यात येणार आहे अशी माहितीही उपसभापती डिसोझा यांनी दिली. नगराध्यक्षांनी तारीख निश्चित केल्यावर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
पालिकेच्या समस्याकडे अधिक लक्ष केंद्रीत करणार
आपण आता म्हापसा नगरपालिकेवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी दिली. पालिकेच्या गाडय़ाचे मोठय़ा प्रमाणात ब्रेक डाऊन झाले आहे. कचरा व्यवस्था ढासळली आहे ही गोष्ट खरी आहे. म्हापसा पालिकेतील मुख्याधिकारी श्री. सावळ हे नवीनच आहे येथे पूर्णवेळ व अनुभवी मुख्याधिकारी पाहिजे कारण म्हापसा ही व्यवसायिकदृष्टय़ा मोठी पालिका आहे. स्वातंत्र्यदिनानंतर म्हापशाला नवीन मुख्याधिकारी मिळणार आहे. शइवाय पूर्णवेळ एटिओ, अधिक कनिष्ठ अभियंता, अन्य दोन पालिका मार्केट घेण्यात येणार आहे. पालिकेकडे कचरा भरण्यास गाडीही पूर्णवेळ उपलब्ध नाही. त्यापरीने सर्वकाही सुरळीत होणार असल्याची माहिती यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी दिली.
म्हापसा पालिकेचा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बदलण्याचा कोणताही निर्णय नाही
म्हापशात पालिकेत कोणत्याही राजकीय घडामोडी होणार नाही. म्हापशाच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर जरी भाजपमध्ये आज रितसर आल्या असल्या तरी भाजपचे बळ वाढविण्यासाठीच त्यांनी रितसर प्रवेश केला असल्याची माहिती आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी दिली. श्रीमती बिचोलकर यांनी आमच्याकडे प्रवेश करतेवेळी काही मागणी केली नाही शिवाय आम्ही त्यांना कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे जोशुआ डिसोझा यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी म्हापशात नवीन वर्णी लागणार असे सर्वत्र बोलले जात आहे ही गोष्ट खरी आहे. आम्ही जेव्हा पालिका घडवून आणली त्यावेळी आमच्याकडे 9 नगरसेवक होते. अशी माहिती डिसोझा यांनी दिली. इतर पक्षाचे नगरसेवकाचा पाठिंबा घेऊन आम्ही गट तयार करून पालिका स्थापन केली असल्याची माहिती आमदारांनी दिली. एका वर्षात आम्ही नगराध्यक्ष बदलणार असे स्पष्ट केले होते मात्र आता तसा काही निर्णय झाला नसल्याचे आमदार म्हणाले. त्यावर आपण काही बोलणार नाही असे त्यांनी सांगितले.









