लक्ष्य केलेले स्थान हमासचे केंद्र असल्याचे प्रतिपादन, हिजबुल्लाही निशाण्यावर
वृत्तसंस्था / जेरुसलेम
गाझा पट्टातील एका स्थानावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक पॅलेस्टाईनी ठार झाल्याचे वृत्त आहे. हे स्थान हमास या दहशतवादी संघटनेचे प्रमुख केंद्र होते, असे इस्रायलचे प्रतिपादन आहे. या हल्ल्यात ठार झालेले सर्वसामान्य नागरीक नसून ते हमासचेच हस्तक होते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या स्थानी बेघर झालेल्या लोकांना आश्रय देण्यात आला होता, असा पॅलेस्टाईनचा दावा आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक नागरीक ठार झाले असे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच अनेक लोक जखमीही झाले आहेत. मात्र इस्रायलने हमासचा दावा खोडून काढताना आपल्या वायुदलाने नागरीकांची जीवीत हानी कमीत कमी होईल, अशा प्रकारे अचूक वायुहल्ला चढविल्याचे प्रतिपादन केले आहे. हल्ला करण्यापूर्वी या स्थानाचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यानंतरच हल्ल्याचे स्थान आणि तीव्रता निश्चित करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची जीवीत हानी कमीत कमी झाली, असे इस्रायलचे म्हणणे आहे.
अल् तबाईन हे हमासचे केंद्र
इस्रायलचा हा नवा हल्ला गाझापट्टीतील अल् तबाईन या इमारत संकुलावर करण्यात आला. हे आपले कमांडर केंद्र आहे, असे हमासने पूर्वी म्हटलेले होते. तथापि, हल्ला झाल्यानंतर आता तेथे हमासचा कोणीही सदस्य नव्हता, असा दावा या संघटनेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यासाठी हमासने इस्रायलचा निषेधही करण्यात आला. असे आणखी हल्ले करण्याच्या तयारीत इस्रायल आहे.
महिन्यातील तिसरा मोठा हल्ला
अल् तबाईनवरील हा हल्ला या महिन्यातील तिसरा मोठा हल्ला होता. पहिला हल्ला 1 ऑगस्टला करण्यात आला होता. त्यात 15 जण मृत्यूमुखी पडले होते. दुसरा हल्ला 4 ऑगस्टला करण्यात आला होता. तो दोन शाळांवर करण्यात आला. त्यात 30 लोक ठार झाले. लहान हल्ले प्रतिदिन केले जात आहेत.
आतापर्यंत किती ठार
8 ऑगस्ट 2023 पासून इस्रालय आणि हमास यांच्यात युद्ध होत आहे. या युद्धात आतापर्यंत गाझा पट्टीत किमान 20 हजार लोकांचा बळी गेला आहे, असे मानले जात आहे. मात्र, निश्चित आकडा कोणीही सांगू शकत नाही. कारण गाझा पट्टीत सर्वेक्षणासाठी जाणेही कठीण आहे. मृतांचे आकडे केवळ हमासकडूनच प्रसिद्ध केले जात आहेत. ते कितपत खरे आहेत, यावर संशय व्यक्त केला जात आहे. खऱ्या आकड्यापेक्षा ते जास्तही असू शकतात किंवा कमीही असू शकतात. तथापि हमासचे अनेक मोठे नेते या युद्धात मारले गेले आहेत, हे अधिकृतरित्या स्पष्ट केले गेले आहे. काही काळापूर्वी हमासचा राजकीय प्रमुख इस्लाईल हानिया याची इराणची राजधानी तेहरान येथील एका सुरक्षित विभागात हत्या करण्यात आली. त्यामुळे इराणने इस्रायलला नष्ट करण्याची धमकी दिली आहे.
इराण हल्ला करणार का ?
हानिया याची हत्या इस्रायलनेच केली आहे, असा इराणचा दावा आहे. त्यामुळे इस्रायलवर या हत्येचा सूड उगविण्यात येईल, अशी धमकी इराणने दिली असून इस्रायलवर थेट आक्रमण पेले जाईल, अशी भाषा केली आहे. तथापि, अद्यापपावेतो असा कोणताही थेट हल्ला त्या देशाने पेलेला नाही. कारण, ते बोलण्याइतके सोपे नाही. इराणने असा हल्ला केल्यास इस्रायलही प्रतिहल्ला करणार हे निश्चित आहे. नंतर या युद्धात अमेरिका, रशिया आणि चीनसारखे बडे देशही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या युद्धाचे रुपांतर महायुद्धात होऊ शकते, असा इशारा अनेक जागतिक संघटनांनी दिला आहे. परिणामी इराणवरही दबाव आहे.
हिजबुल्लाही इस्रायलच्या निशाण्यावर
इराण समर्थिक हेजबुल्ला ही संघटना इस्रायलच्या निशाण्यावर आहे. या संघटनेचे कार्यक्षेत्र लेबेनॉन हा देश आहे. ही संघटना दहशतवादी आणि शस्त्रसज्ज असून ती इस्रायलवर उत्तरेच्या बाजूने हल्ले करीत असते. त्यामुळे इस्रायलने आपली उत्तर सीमा भक्कम केली असून हिजबुल्लावर अनेक हल्ले केले आहेत. इराण प्रत्यक्ष हल्ला न करता हिजबुल्लाच्या माध्यमातून करेल अशीही अटकळ आहे.
हल्ल्याची तीव्रता वाढणार
ड इस्रायलकडून यापुढे हल्ल्यांची तीव्रता वाढविली जाण्याची शक्यता
ड आतापर्यंत या युद्धात 20 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता
ड इस्रायलवर थेट हल्ला न करण्यासाठी इराणवर चहूबाजूंनी दबाव
ड इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिका-युरोपनेही केली आहे मोठी सज्जता









