उत्तर प्रदेशातील झाशी येथील घटना
वृत्तसंस्था/ झाशी
उत्तर प्रदेशातील झाशी जिह्यात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएच्या पथकाने गुरुवारी जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह अन्य चार राज्यांमध्ये छापे टाकले होते. यादरम्यान एनआयएचे पथक उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये कारवाईसाठी मुफ्ती खालिदच्या घरी पोहोचले होते. कसून तपासणी केल्यानंतर एनआयएने मुफ्ती खालिदला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. या प्रकरणाचा तपास आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी टीमवर हल्ला करणाऱ्या 100 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
खालिदच्या घरी येण्यापूर्वी एनआयएची टीम मुकरायना येथील मशिदीत राहणारा त्याचा नातेवाईक साबीर नदवी याच्या घरीही पोहोचली होती. सुमारे तासभर त्याची चौकशीही करण्यात आली. त्यानंतर एनआयएचे अधिकारी खालिदच्या घरी पोहोचले असता त्यांना गावकऱ्यांनी रोखले आणि पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे खालिदला ताब्यात घेण्यासाठी पथकाला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
एनआयएच्या कारवाईदरम्यान मुफ्ती खालिद यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती. यामुळे तेथील लोकांनी मशिदीतून घोषणा केल्यानंतर लगेचच मुफ्ती खालिद यांच्या घराबाहेर लोक जमल्यानंतर एकच गर्दी झाली. तिथे लोकांनी जमाव जमवून गोंधळ घालत एनआयए टीमवर हल्ला केल्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली.









