चिपळूण :
नगर परिषदेने हाती घेतलेली शहरातील अतिक्रमणावरील कारवाई शुक्रवारी दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र करण्यात आली. दिवसभर शहरातील 100 अतिक्रमणे जमीनदोस्त केली. गेल्या 2 दिवसात 175 अतिक्रमणे दूर करण्यात आल्याने बहुतांशी शहर मोकळे झाले आहे. ही कारवाई करताना हजारो रूपयांची मच्छी, भाज्या, फळे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. पानगल्ली व भाजी मंडई परिसर तर अनेक वर्षांनी मोकळा झाला आहे. त्यामुळे आता बंड्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्याची तयारी प्रशासन करीत असल्याने त्यांच्याही अतिक्रमणावर लवकरच जेसीबी फिरणार आहे. शहर अतिक्रमणमुक्त राहण्यासाठी आता दररोज अतिक्रमणविरोधी पथक फिरणार आहे. कारवाईनंतरही कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
गेल्या काही वर्षापासून शहरातील अतिक्रमणात कमालीची वाढ होताना दिसत होती. यामुळे वाहतूककोंडी होऊन त्यात शहर व नागरिक गुदमरत होते. त्यामुळे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी याची दखल घेत गुरुवारपासून अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी मध्यवर्ती बसस्थानक ते चिंचनाका परिसरातील सुमारे 75 अतिक्रमण तोडण्यात आली. यामुळे अर्धे शहर मोकळे झाले. त्यामुळे शुक्रवारी चिंचनाका ते बाजारपेठ, बाजारपूल, मार्कंडी आदी भागात ही कारवाई वळवण्यात आली. अनेक वर्षांनी पानगल्लीत धडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांची भाजी, टे व अन्य साहित्य जप्त करीत ते डंपरमध्ये भरून थेट कचरा प्रकल्पात नेण्यात आले. ही गल्ली अतिक्रमणमुक्त करताना गटारांवरील कडाप्पेही तोडून त्याचे तुकडेही डंपरमधून नेण्यात आले.
बाजारपेठेत कारवाई करताना व्यावसायिकांची पळापळ झाली. त्यामुळे अनेकांच्या हातगाड्या, फळे, कपडे विक्रेत्यांच्या बाहुल्या आदी साहित्यही जप्त करीत ते वाहनांमध्ये भरण्यात आले. गटारांवरील लेंटरही तोडण्यात आली आहेत. रिक्षा थांब्यांचे अनधिकृत फलकही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांशी शहरात आता छप्पर दिसेनाशी झाली असून बाजारपेठ मोकळी दिसू लागली आहे. यामुळे इतरांच्या अतिक्रमणात झाकून जाणारी दुकाने आता सहज दिसू लागल्याने व्यापारी आनंदले आहेत.
शुक्रवार असल्याने बाजारपूल येथे अनधिकृत मच्छी बाजार भरणाऱ्या व्यावसायिकांनी यापूर्वी कल्पना देऊनही मोठ्या प्रमाणात मच्छी आणली होती. मात्र या कारवाईत हजारो रूपयांची मच्छी, टे व अन्य साहित्य चक्क जप्त करण्यात आले आहे. कारवाईला सुरूवात होताच अनेक व्यावसायिकांनी येथून पळ काढला. त्यामुळे त्यांचे साहित्य इतरस्त्र पडले होते. त्यांचे जप्त साहित्य परत मिळावे, यासाठी अनेकांनी राजकीय ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने त्यास बळी न पडता कोणालाही साहित्य परत दिले नाही.
- कारवाई ठिकाणीच नागरिकांकडून कौतुक
शुक्रवारीही मुख्याधिकारी विशाल भोसले कारवाईत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, मालमत्ता विभागाचे प्रमुख सागर शेडगे, अतिक्रमणमुक्त विभागाचे प्रमुख संदेश टोपरे आदींसह 70 कर्मचारी, 2 जेसीबी, 4 डंपर व पोलीस बंदोबस्त तैनात होता. पानगल्ली व बाजारपूल येथे धडक कारवाई करताना अनेक नागरिकांनी भोसले यांना भेटून त्यांना व अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत कारवाईचे कौतुक केले.
- दररोज पथक फिरणार
शहरातील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा कोणीही अतिक्रमण करू नये म्हणून दररोज अतिक्रमणविरोधी पथक शहरात फिरून कारवाई करीत राहणार आहे. मात्र कारवाईनंतरही जे व्यावसायिक पुन्हा–पुन्हा अतिक्रमण करतील, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशी वेळ कोणीही प्रशासनावर आणू नये, असे आवाहन चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.








