सातारा :
सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा विविध योजनांमध्ये राज्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतो. राज्यातील बहुतांशी येणाऱ्या नविन योजनांचे पथदर्शी प्रकल्पांची सातारा जिह्यातून सुरुवात होत असते. भौतिक व आर्थिक उद्दिष्ट पूर्तता करण्यामध्ये नेहमी अव्वल असणाऱ्या या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एका नविन प्रकल्पामध्ये जिल्ह्याने अत्यंत समाधानकारक अशी कामगिरी केलेली आहे. डिजीटल हजेरीत सातारा जिल्हा राज्यात एक नंबरला आलेला आहे. आरोग्य विभागामध्ये ही डिजीटल हजेरी अनिवार्य केली आहे.
सातारा जिह्याने यापूर्वी अनेक उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवले गेले आहेत. त्याचप्रमाणे डिजीटल हजेरीचा उपक्रमही सातारा जिह्यात राबवताना सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या संघटनांनी विरोध दशर्वला होता. परंतु त्यांच्याशी चर्चा करत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी त्यांना डिजीटल हजेरी कशी महत्वाची आहे ते समजून सांगितले. त्यानुसार ऑक्टोबरपासून ही प्रणाली साताऱ्यात सुरु झाली आहे. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्तांच्या दि. 5 मार्च रोजीच्या आदेशानुसार आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची दैनंदिन हजेरी फेस रिडींग तसेच बायोमेट्रीक पध्दतीने करण्याची प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यत पूर्ण करुन माहे एप्रिल 2025 पासूनचे मासिक वेतन ऑनलाईन दैनंदिन हजेरी अहवालानुसारच अदा करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी नोंद करण्यासाठी अॅपचा वापर सुरु करुन यांतर्गत सुमारे 1512 नियमित कर्मचारी तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 1120 कर्मचारी यांची नोंद ऑनलाईन फेस रिडींग प्रणालीमध्ये करण्यात आली आहे. ही प्रणाली मोबाईलमध्ये चालणारे अॅप्लिकेशन असल्यामुळे हजेरी नोंदणी करण्याकरीता बायोमेट्रीक मशीन करीता वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची बचत झालेली आहे. या अॅपमध्ये “जीओ फेनसिंग“ ही सुविधा असून यातंर्गत कर्मचारी ज्या कार्यालयामध्ये कार्यरत असतो. त्या कार्यालयामध्ये जावूनच ऑनलाईन हजेरी विहित वेळेमध्ये नोंदवावी लागते. यामुळे कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय सेवांची पोहोचण्यास मदत होणार आहे.
- गावभेटीचीही नोंद अॅपवर करता येणार
हे अॅप वापरण्यास अत्यंत सोपे असून एकदा नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन दिवशी केवळ इन आणि आऊट वेळेत आपली हजेरी नोंदविण्याची आहे. तसेच क्षेत्र भेटीकरीता कर्मचारी भागात असतील तर भेट दिलेल्या गावाची अथवा संस्थेची नोंद अॅपवर करता येते. युबीआय अॅपमध्ये जिल्ह्यातील जिल्हा स्तरावरील जि. प. सातारा, प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय, पंचायत समिती स्तरावरील 11 तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, 15 ग्रामिण रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये, 84 प्राथमिक आरोग्य केंद्र, 18 पब्लिक हेल्थ युनिट व 415 उपकेंद्र, इ. आरोग्य संस्थांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्हा आरोग्य विभागांतर्गत ऑनलाईन हजेरी प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करणारा पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिलेली आहे.








