कोल्हापूर :
केंद्रीय आरोग्य विभागांतर्गत 100 दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील 347 निवडलेल्या जिह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. जिल्ह्यात शनिवारी, 7 डिसेंबरपासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नि–क्षय शिबीर, एम.आय.डी.सी., अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, साखर कारखाना कामगार, ऊस तोडणी कामगार, हातमाग कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 7 डिसेंबरपासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ शनिवारी होत आहे. या मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती असा आहे. जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र कडून पोषण आहार कीटचे वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्रीय सहभाग नोंदवून 2025 पर्यंत कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त होईल, यासाठी प्रयत्न करावेत्। असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी केले.
ते केंद्रीय स्तरावरील ऑनलाईन बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव ठाकूर उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी ज्या कार्यक्षेत्रामध्ये अधिक क्षयरुग्ण सापडले आहेत, त्या जोखीमग्रस्त भागाचे मॅपिंग करावे. त्या भागातील क्षयरुग्णांच्या घरातील व्यक्ती, संपर्कातील व्यक्ती,नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणावरील व्यक्तींचे सर्वेक्षण करावे. क्षयरोग संशयित व्यक्तीच्या थुंकी तपासणीबरोबरच क्ष–किरण तपासणी करण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नि–क्षय शिबीर, एमआयडीसी, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह, येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, साखर कारखाना कामगार, ऊस तोडणी कामगार, हातमाग कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेत सामाजीक संस्था, कार्यकर्ते व इतर विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.








