ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बांधकाम कामगार आणि वेठबिगारांसाठी सुरू असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त एका मराठी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताचा दाखला देत आ. एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून या योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्याच मुद्यावर आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यान्ह भोजन योजनेवर खर्च केलेल्या गेल्या सात ते आठ महिन्यांच्या खर्चाची आकडेवारी मांडली. यावेळी त्यांनी या योजनेत 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.
अंधारे म्हणाल्या, माझ्याकडे जळगाव जिल्ह्याची माहिती आहे. 20 फेब्रुवारी 2023 ला गायत्री सोनावणे यांनी अटल योजनेतंर्गत किती लाभार्थ्यांना भोजन देता याची माहिती मागवली. त्यावर 35-40 हजार आकडा विभागाने सांगितला. त्यानंतर पुन्हा 9 मार्चला अशी कोणती संस्था आहे. ज्यांच्याकडून टेंडर मागवली आणि त्यांची किती बिले दिली याची माहिती मागवली. यावर 30 मे 2023 रोजी उत्तर देताना मार्चपर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. त्यामध्ये 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या काळात 15 दिवसांच्या मध्यात्ह भोजनाचा खर्च 58 लाख 64 हजार रुपये खर्च आहे. पण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या एक महिन्याच्या काळात 2 कोटी 47 लाखांचे बिल आहे. कदाचित बांधकाम मजुरांची संख्या वाढली असावी. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये 1 ते 30 याकाळात 3 कोटी 13 लाख 58 हजार रुपये खर्च होतो. डिसेंबरमध्ये 4 कोटी 53 लाख 34 हजार खर्च होतो. 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 काळात 6 कोटी 96 लाख 47 हजार बिल होते. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीत 7 कोटी 99 लाख खर्च होतो.
आधीच्या 5 महिन्याचे बिल 25 कोटी रुपये काढले. तर त्यानंतर पुढच्या 2 महिन्याचे बिल 25 कोटी 26 लाख 62 हजार 558 बिल काढले. ही सगळी बिलं काढली गेली. त्याचे लाभार्थी नेमके कोण? याची माहिती मागवली.या यादीत ज्यांची नावं आणि फोन नंबर होते त्यांना आम्ही फोन केले. तर हे लोक आमच्याशी गुजराती भाषेत बोलू लागले. आम्ही गुजरातमध्ये राहतो. कधी महाराष्ट्रात आलोच नाही, अशी उत्तरं आम्हाला मिळाली. तर काही लोकांनी सांगितलं आम्ही कर्नाटकमध्ये राहतो. त्यामुळे हे सगळे लाभार्थी खोटे असून योजनेवर खर्च झालेले कोटय़वधी रुपये कुठे गेले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.