केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही केंद्र सरकारची अभिनव संकल्पना असून, या संकल्पनेचा एक भाग म्हणून गोवा राज्यातही एक जिल्हा एक उत्पादनासाठी प्रौत्साहन देण्यात येणार आहे. गोवा सरकारला युनिटी मॉलचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासंबंधी सूचना करण्यात आली आहे. युनिटी मॉलसाठी केंद्राने ़ गोव्यासाठी युनिटी मॉलसाठी 100 कोटी ऊपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी दिली.
पणजीतील पर्यटन भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपिका, स्वेतिका सचन आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्य मंत्री सोम प्रकाश म्हणाले, विविध प्रकारच्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी ओडीओपी ही अतिशय चांगली योजना आहे. युनिटी मॉल ही भारत सरकारची अनोखी संकल्पना आहे. गोव्याने युनिटी मॉलसंदर्भात एक परिपूर्ण आराखडा सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले, गोव्याच्या विविध प्रकारच्या हस्तकला, कला आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकण्याच्या सामायिक उद्देशाच्या अनुषंगाने, राज्य सरकार इन्व्हेस्ट इंडियाच्या सहकार्याने ’युनिटी मॉल’ सुऊ करणार आहे. यात पर्यटकांना गोव्यातील उत्पादनांबरोबरच सर्व राज्यांतील वैशिष्ट्यापूर्ण उत्पादने एकाच छताखाली मिळतील. युनिटी मॉल मध्ये ’एक जिल्हा, एक उत्पादन’ यासह स्थानिक हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील. केंद्र सरकार गोव्याला अनेक प्रकारे मदत करत आहे. युनिटी मॉलचा डीपीआर महिनाभरात केंद्राकडे सादर केला जाईल, असेही ते म्हणाले.
काजू, फेणीची सार्थ निवड
‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही केंद्र सरकारची अभिनव संकल्पनेअंतर्गत गोवा राज्यातील उत्तर गोवा जिह्यासाठी ओडीओपी उपक्रमांतर्गत काजूला पहिले उत्पादन तर फेणीला दुसरे उत्पादन म्हणून निवडण्यात आले आहे. दक्षिण गोवा जिह्यात, फेणीला पहिले आणि काजूला दुसरे उत्पादन म्हणून निवडले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी दिली.









