ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पक्षबदलासाठी मला आजही 100 कोटींची ऑफर आहे, असा खळबळजनक दावा शिवेसेनेचे (उबाठा) आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सुनिल राऊत म्हणाले, संजय राऊत नावाचा ब्रँड माझ्यामागे आहे. त्यामुळे मला आजही 100 कोटींची ऑफर आहे. 100 कोटींसाठी पक्ष बदलून जे शिवसैनिक निष्ठेने माझ्यासोबत काम करत आहेत, ते मला परत मिळणार आहेत का? त्यामुळे मी कधीही शिवसेना (उबाठा) सोडणार नाही. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. आमचीच माणसे विकत घेऊन जातात. आमच्याच माणसांना आमच्यासमोर उभे करतात. मला एकही रुपयाचा फंड सरकारकडून मिळत नाही. माझ्यावर 35 कोटींचे कर्ज आहे. 35 कोटींची कामे केली पण सरकार मला पैसे देत नाही, असा आरोपही सुनील राऊत यांनी केला.
दरम्यान, खा. संजय राऊत यांनीही सुनील राऊत यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. संजय राऊत यासंदर्भात बोलताना म्हणाले, माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांवरही दबाव टाकण्यात आला होता. 100 कोटींची ऑफर आम्हाला होती. पण आम्ही फुटलो नाही. तुरुंगात गेलो. त्याआधी तुरुंगात जायचं नसेल तर अमुक गटाकडे जा, असे फोन दिल्लीतून आले होते. पण आम्ही निष्ठा विकली नाही. शिवसेनेसोबतची निष्ठा विकणं म्हणजे आईला विकणं. जे सोडून गेले त्यांनी आपलं ममत्व विकलं. 2024 साली या सगळ्यांना पश्चाताप होईल, असेही संजय राऊत म्हणाले.








