वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्वस्त औषध विक्री करणाऱया जेनेरिक औषध केंद्रांनी या वेळेला शंभर कोटी रुपयांच्या विक्रीचा आकडा पार केला आहे. सदरच्या औषध विक्री दुकानांमध्ये सोळाशेहून अधिक जेनेरिक औषधे त्याचप्रमाणे 250 हून अधिक शस्त्रक्रिया संबंधित उपकरणे विक्री करण्यात येतात. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री भारतीय जेनेरिक औषध केंद्रांमार्फत स्वस्त औषधांची विक्री करण्यासाठी जेनेरिक औषध केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
739 जिल्हय़ांमध्ये केंद्रे
सध्याला देशातील 739 जिह्यांमध्ये 8 हजार 735 जेनेरिक औषध केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. सरकारने स्वस्त किमतीची औषधे तिही चांगल्या दर्जाची उपलब्ध करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून 2024 पर्यंत या औषध केंद्रांची संख्या 10 हजारपर्यंत वाढवण्याचा विचारही सरकारने चालवला आहे.
2015 मध्ये केंद्रे सुरू
फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही केंदे चालवली जातात. सदरची जेनेरिक औषध केंद्रांची योजना 2015 मध्ये प्रत्यक्षात आली आहे. लोकांचा औषधांवरचा खर्चाचा बोजा कमी व्हावा म्हणून त्यांच्यासाठी या केंद्रांमार्फत स्वस्त औषधे उपलब्ध केली जातात. सुरुवातीच्या वर्षांमध्ये जवळपास 8 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री करण्यात आली होती. मात्र गेल्या मे महिन्यामध्ये सदरच्या जेनेरिक औषध केंद्रातून जवळपास 100 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री झाल्याची माहिती आहे. यातुलनेत 2021 मध्ये मे महिन्यामध्ये 83 कोटी रुपयांची औषधे विक्री झाली होती.








