अमेरिकेत सलग दुसऱया दिवशी 71 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात तेथे 1,195 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्णसंख्या आता 41,01,308 वर पोहाचली आहे. व्हाइट हाउसच्या कॅफेटेरियात काम करणाऱया दोन कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेने 100 कोटी लसींची खरेदी करण्यासाठी दोन कंपन्यांशी 2 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. अमेरिकेची फायजर आणि जर्मनीच्या बायोएनटेक या कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे मानले जात आहे. तत्पूर्वी ब्रिटनने फायजर आणि दोन अन्य कंपन्यांसोबत 90 कोटी लसी खरेदी करण्याचा करार केला होता.
वर्षाअखेरपर्यंत लस : फायजर
ऑक्टोबरच्या प्रारंभी नियामकीय मंजुरी मिळेल आणि वर्षाच्या अखेरपर्यंत कोविड-19 लस बाजारात सादर करणार असल्याचा विश्वास फायजर या दिग्गज औषध उत्पादक कंपनीने व्यक्त केला आहे. जर्मन भागीदार बायोएनटेकच्या सहकार्याने फायजर लस विकसित करत आहोत. कंपनीने 10 कोटी डोस देण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनासोबत सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा करारही केला आहे.
सर्वात चांगल्या स्थितीत वर्ष संपण्यापूर्वी लसीसाठी मंजुरी आणि वर्ष संपण्यापर्यंत लस प्राप्त करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कनेक्टिकटमध्ये फायजरच्या औषध सुरक्षा संशोधन आणि विकास विभागाचे उपाध्यक्ष जॉन बुखहर्ड यांनी माहिती दिली आहे.
लसनिर्मिती प्रक्रियेदरम्यान सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही. आम्ही अत्यंत आशावादी असून अमेरिकेच्या नागरिकांना लस मोफत स्वरुपात मिळणार असल्याचे बुखहर्ड म्हणाले. तर अमेरिकेचे प्रशासन 500 दशलक्ष अतिरिक्त डोस प्राप्त करण्याचा विचार करत असल्याचे समजते.2021 च्या अखेरपर्यंत 1.3 अब्जाहून अधिक डोसची निर्मिती होऊ शकते. फायजर लसनिर्मितीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. शर्यतीत अनेक जण विजेते असू शकतात आणि आम्हाला अनेक विजेत्यांची गरज असल्याचे उद्गार कनेक्टिकटचे गव्हर्नर नेड लामोंट यांनी काढले आहेत.









