दुसरे काही खायला दिल्यास रडू लागतो
जगात अनेक आजार अत्यंत धोकादायक आहेत आणि अजब देखील. अशाच एका अजब आजाराला 12 वर्षीय मुलगा सामोरा जात आहे. या आजारामुळे हा मुलगा सामान्य मुलांप्रमाणे प्रत्येक खाद्यपदार्थ खात नाही. ब्रेड आणि दही वगळून त्याच्यासमोर अन्य कुठलीही गोष्ट ठेवल्यास तो रडू लागतो. त्याच्या आईवडिलांनी त्याला अन्य सकस आहार देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही.
युनायटेड किंगडमच्या नॉरफोक शहरात राहणारे आईवडिल स्वतःच्या 12 वर्षीय मुलाच्या म्हणजेच एश्टन फिशरच्या आहारावरून अत्यंत चिंतेत आहेत. वाढत्या वयासोबत तो अन्य मुलांप्रमाणे संपूर्ण आहाराचे सेवन करत नाही. मागील 10 वर्षांपासून तो केवळ ब्रेड आणि दहीच खातोय. याविषयी एश्टनच्या आईवडिलांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यावर हैराण करणाऱया आजाराविषयी समजले आहे.
एश्टनला फूडफोबिया असल्याने त्याला खाण्यासाठी अन्य काही देणे पसंत पडत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जुलैत एश्टनला ईटिंग डिसऑर्डर स्पेशलिस्टला दाखविण्यात आले, तेव्हा एश्टनरला खाण्याचीच भीती वाटत असल्याचे समोर आल्याची माहिती त्याची आई काराने दिली आहे.
एश्टनला अवोयडेंट रिस्ट्रिक्टिव्ह फूड इनटेक डिसऑर्डर (एआरएफआयडी) आहे. यामुळे एश्टन अन्य काही खाण्यास घाबरत असल्याचे ईटिंग डिसऑर्डर स्पेशलिस्टने सांगितले. एश्टनला कुठलाच पोषक घटक मिळत नसल्याने आम्हाला चिंता वाटते. भयावह भीतीला तोंड देत असल्याने तो अन्य काहीच खात नसल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे.
नाताळाच्या डिनर पार्टीदरम्यान घरात स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार केले जात नाहीत, कारण एश्टनला त्यांचा गंध पसंत नसल्याचे कारा यांनी सांगितले आहे. पण एश्टनला आता समुपदेशन आणि अन्य पद्धतींनी काही वेगळे खाण्यासाठी तयार केले जात आहे. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होत असून तो अन्य गोष्टी खाण्याचा प्रयत्न करत आहे.









