स्वतःहून अधिक वयाच्या पैलवानांना चारली धूळ
क्यूटा कुमागाईचे वय केवळ 10 वर्षे असून वजन 85 किलो आहे, पण क्यूटा 16 वर्षीय मुलावर मात करण्याचे बळ राखून आहे. क्यूटाने मागील वर्षी ब्रिटन आणि युक्रेनच्या पैलवानाला हरवून अंडर-10 जागतिक स्पर्धा जिंकली होती. स्वतःपेक्षा अधिक वयाच्या पैलवानांना हरविण्यास सर्वाधिक आनंद वाटतो. परंतु कधीकधी सामना अत्यंत चुरशीचा झाल्यावर पराभव मान्य करू असे वाटत असल्याचे क्यूटा सांगतो.
क्यूटा आठवडय़ातील तीन दिवस स्थानिक क्लबमध्ये वेट ट्रेनिंग घतो. याचबरोबर शरीराला लवचिक ठेवण्यासाठी पोहण्याचा सरावा करतो. वयाच्या तिसऱया वर्षापासूनच तो प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या आहारात एक लिटर दूध आणि मोठय़ा प्रमाणात प्रथिनांचा समावेश आहे. एका दिवसात तो 3 ते 4 हजार कॅलरींचे ग्रहण करतो. तसेच तो प्रतिदिन चेनो नाबे खातो. हा विशेष प्रकारचा खाद्यपदार्थ असून यात भाज्यांसह मांसाचाही वापर करण्यात येतो. सूमो पैलवान स्वतःचे वजन वाढविण्यासाठी याला पसंती देतात.

विशेष धडे द्यावे लागले नाहीत
क्यूटाला काहीही शिकविण्याची गरज भासली नाही. तो अनेक गोष्टी स्वतःहूनच करतो. तो अत्यंत प्रतिभावान असून अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याला स्वतःचे वजन आणखीन 20 किलोंनी वाढविण्याची गरज असल्याचे क्यूटाचे वडिल ताइसुके यांनी म्हटले आहे. ताइसुके हे टोकियोत कुटुंबासोबत राहतात. माजी रेसलर शिनिची तायरा यांच्याकडून क्यूटा सध्या प्रशिक्षण घेत आहे.
मंदिरात प्रशिक्षण
क्यूटाचे प्रशिक्षण तेथील एका मंदिरात होते. प्रशिक्षणादरम्यान हार पत्करावी लागल्यावर क्यूटा कधीकधी रडू लागतो. परंतु हीच स्थिती त्याला एक उत्तम पैलवान होण्यास मदत करणार असल्याचे त्याचे वडिल सांगतात.









