शेळवण-कुडचडे येथील 2018 मधील प्रकरण
मडगाव : शेळवण-कुडचडे येथील सूर्यकांत देसाई यांच्या खून प्रकरणासंबंधी मडगावच्या सत्र न्यायालयाने शेळवण – कुडचडे येथील शेवंती विष्णू देसाई व हेमंत उर्फ सर्वेश विष्णू देसाई यांना प्रत्येकी 10 वर्षांच्या कैदेची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुजा कवळेकर यांच्या न्यायालयाने या दोन्ही आरोपींना काल मंगळवारी ही शिक्षा ठोठावली. कुडचडे पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता. सरकारी वकील डी. कोरगावकर यांनी सरकारपक्षातर्फे काम पाहिले. खुनाची ही घटना 23 फेब्रुवारी 2018 रोजी घडली होती. 7 एप्रिल 2018 रोजी या खून प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. 13 डिसेंबर 2018 रोजी या प्रकरणी न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले होते. 22 ऑगस्ट 2023 रोजी न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही आरोपींना दोषी घोषित केले होते आणि मंगळवारी 29 ऑगस्ट 2023 रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार सूर्यकांत देसाई यांच्या खुनाची ही घटना 23 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमाराला घडली होती. दोन्ही आरोपोनी सूर्यकांत यांच्या डोक्यावर फावड्याने वार केला होता. गंभीररित्या जखमी झालेल्या सूर्यकांत यांना सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार चालू असताना सूर्यकांत यांना मृत्यू आला होता.
यावेळी सूर्यकांत यांची पत्नी श्रीशा देसाई, कामगार गौर चाँद बर्मन आणि जोरजोरात होत असलेला युक्तीवाद ऐकून घटनास्थळी आलेले मयताचे वडिल विठोबा देसाई यांच्या डोळ्यासमोर ही खुनाची घटना घडली होती. आरोपींच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाच्या नजरेला असे आणून दिले की आरोपींचा मयताचा खून करण्याचा कोणताच उद्देश नव्हता. जे काही घडले होते ते रागाच्या भरात एका क्षणात घडलेले होते आणि म्हणून आरोपींना किमान शिक्षा देण्याची आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे विनंती केली होती. या प्रकरणातील आरोपी आणि मयत हे दोघेही नातेवाईक आहेत. मात्र मयत जखमी झाल्यानंतर आरोपींनी कोणतीच वैद्यकीय मदत देऊ केली नाही. म्हणून आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी असा सरकारपक्षाने युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या. कवळेकर यांच्या न्यायालयाने आरोपींना 10 वर्षाची कैदेची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम भरल्यास ती रक्कम मयताच्या वारसांना देण्यात यावी आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 6 महिने शिक्षा भोगावी असा न्यायालयाने निवाडा दिला.









