जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल, 30 हजार रुपये दंड
कोल्हापूर प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर ओळखीचा फायदा घेवून बलात्कार केल्याप्रकरणी तरुणास जिल्हा व सत्र न्यायालयाधीश एम. बी. तिडके यांनी मंगळवारी 10 वर्षे सक्त मजूरी व 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गौरव सतीश कांबळे (वय 27, रा. पोस्ट ऑफिसजवळ, रमणमळा, कोल्हापूर) असे आरोपीचे नांव आहे. फेब्रुवारी ते मार्च 2017 मध्ये ही घटना घडला होता. सरकार पक्षातर्फे अॅङ अस्मिता कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गौरव कांबळे याने फेब्रुवारी ते मार्च 2017 मध्ये पीडित अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार घरात कोणाला सांगितल्यास आई, वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित मुलगी साडेतीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या आईने याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. यानंतर तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक टी. जी. देशमुख यांनी तपास करून कांबळे याच्यावर आरोपपत्र दाखल केले. अॅड. कुलकर्णी यांनी कोर्टात आठ साक्षी तपासल्या. पीडित मुलगी, तिची आई यासह अन्य साक्षी, तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी आरोपीस दोन वेगवेगळ्या गुह्यात दहा वर्ष सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून सुरेश परीट आणि माधवी संजय घोडके यांनी काम पाहिले.