वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी; जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य सरकारने बांधकाम कामगारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे ते विविध प्रश्नांपासून वंचित आहेत. यंदा तरी त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी 10 हजार रुपये बोनस सरकारने जाहीर करावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनतर्फे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या तीन-चार वर्षापासून बांधकाम कामगारांना महापूर, कोरोना महामारी यासह महगाईची झळ बसत आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याने अनेक बांधकाम कामगार व त्यांचे कुटूंबिय वर्षातून एकदा येणार्या दिवाळी सणापासून वंचित आहेत. दिवाळी सण साजरा करता यावा, यासाठी गेली अनेक वर्षे पक्षाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील दिवाळी बोनससाठी पाठपुरावा सुरु आहे. तत्कालिन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनीही बोनस देण्याबाबत केलेली घोषणा हवेतच विरुन गेली आहे.
ज्या कामगारांना जागा व घर नाही त्याला घर मिळण्यासाठी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगली जिह्यात नोंदीत कामगारांसाठी मिरज येथे घरकुल योजनेकरीता †िजह्यात सर्व्हे सुरु केला आहे. परंतु मंत्री खाडे यांना ही योजना फक्त सांगली जिह्यापुरतीच राबवायची आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी सांगली जिह्याच्या धर्तीवर सर्वच जिह्यात बांधकाम कामगारांसाठी घरकुलाची योजना राबवावी. तसेच जिह्यासाठी कायमस्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्तांची नेमणूक करावी. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, लक्ष्मण सावरे, संभागी कागलकर, प्रशांत वाघमारे, कल्पना शेंडगे, सुहासिनी माने, किशोर भोसले, सुवर्णा गायकवाड आदींचा समावेश होता.